संविधानाच्या ७५ वर्षाच्या गौरवशाली प्रवासावर लोकसभेत आज चर्चा झाली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभाग घेत काँग्रेसवर आणि पंडित जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधीपर्यंत सर्वांवर टीका केली. जवळपास पावणेदोन तास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण चालू होतं. या भाषणावर आता काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे. लोकसभेचं कामकाज संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
१९५२ पूर्वी देशात इलेक्टेड नव्हेतर सिलेक्टेड सरकार होतं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. तसंच, ५५ वर्षांच्या काळात काँग्रेसने ७५ वेळा संविधानात बदल केला असल्याचाही दावा केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच इंदिर गांधींनीही संविधानाचा अपमान केलाय. त्यांनी न्यायव्यवस्थेचे पंखही छाटले होते, असं मोदी म्हणाले. प्रत्येक स्तरावर गांधी कुटुंबाने संविधानाला आव्हान दिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काँग्रेस सरकारने हातोडा मारला. यामुळे संवधान निर्मात्यांचा घोर अपमान केला असल्याचंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घणाघाती टीकांवर प्रियांका गांधी यांनी सदनाबाहेर प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “मोदींनी एकही नवी गोष्ट सांगितली नाही. त्यांच्या भाषणामुळे बोअर आम्ही झालो. खूप दशकानंतर मला असं जाणवलं की शाळेत गणिताचा अतिरिक्त तास असायचा ना.. मला त्या तासाला बसल्यासारखं वाटलं.”
“नड्डाही हात चोळत बसले होते. अमित शाह डोक्यावरून हात फिरवत होते. पीयूष गोयलही झोपायला आले होते. मला वाटलेलं पंतप्रधान काहीतरी नवीन बोलतील. भ्रष्ट्राचारप्रती शून्य सहिष्णूता आहे तर अदाणी प्रकरणावर चर्चा तर करा”, असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.