kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

अमित शहा यांनी पहलगाम हल्ल्यातील तीन मास्टरमाईंड दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवमध्ये मारल्याची केली पुष्टी

पहलगाम हल्ल्यात सहभाग असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्यानं सोमवारी केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिली. सोमवारी जम्मू – काश्मीरमधील श्रीनगर येथे झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आलंय. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्यानं ‘ऑपरेशन सिंधूर’ रावबत पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी ठिकाणं उडवली होती. यात जवळपास 100 हून अधिक दहशतवादी ठार केले होते. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मुख्य दहशतवादी मोकाट असल्यानं संताप व्यक्त करण्यात येत होते. तशी टीकाही विरोधकांनी सरकारवर केली होती. अखेर सोमवारी (28 जुलै) भारतीय सैन्यानं या हल्ल्यातील तीन मुख्य दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.

लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “कालच्या कारवाईत सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले. जे लोक या दहशतवाद्यांना अन्न पुरवत होते, त्यांना आधीच ताब्यात घेण्यात आलं होतं. या दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणण्यात आले, तेव्हा ताब्यात घेतलेल्या लोकांनी त्यांची ओळख पटवली.”

‘ऑपरेशन महादेव’बद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “‘ऑपरेशन महादेव’मध्ये सुलेमान उर्फ फैजल, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले. सुलेमान हा लष्कर-ए-तोयबाचा ए-ग्रेडचा कमांडर होता. अफगाण हा देखील लष्कर-ए-तोयबाचा ए-ग्रेड दहशतवादी होता आणि जिब्रान देखील ए-ग्रेड दहशतवादी होता. बैसरन खोऱ्यात आपल्या नागरिकांना मारणारे तिन्ही दहशतवादी मारले गेले आहेत.”