लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात ई सिगारेटचा मुद्दा अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला आणि ज्यानंतर लोकसभेत मोठा गदारोळ पाहण्यास मिळाला. अनुगार ठाकूर यांनी तृणमूलच्या खासदारावर लोकसभेच्या सभागृहात ई सिगारेट पिण्याचा आरोप केला, ज्यानंतर गदारोळ झाला. अशा प्रकारचं वर्तन हे संसदीय नियमांच्या विरोधात आहे आणि संसदेच्या मर्यादांचा हा अपमान आहे असंही अनुराग ठाकूर म्हणाले.
अनुराग ठाकूर काय म्हणाले?
अनुराग ठाकूर म्हणाले, संसदेतलं लोकसभेचं सदन हे कोट्यवधी लोकांच्या आशा आकांक्षाचं प्रतीक आहे. तृणमूलच्या खासदाराने सभागृहात ई सिगारेट पिणं योग्य नाही. जे वर्तन झालं ते संसदेच्या नियमांना धरुन नाही. हा मुद्दा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने घेतला पाहिजे. कारण भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडता कामा नयेत. अनुराग ठाकूर यांनी आरोप करताच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला काय म्हणतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यानंतर ओम बिर्ला म्हणाले ई सिगारेट संदर्भात कुणालाही विशेषाधिकार किंवा कुठलीही अतिरिक्त सूट दिली गेलेली नाही. ई सिगारेट असो किंवा धूम्रपान सगळ्या गोष्टी संसदेत प्रतिबंधितच आहेत.
खासदार कुणीही असो सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष, सगळ्यांसाठी नियम सारखेच असतात. लोकसभा या सभागृहाचं पावित्र्य राखणं हे प्रत्येक सदस्याचं काम आहे. सध्या हा मुद्दा उपस्थित झाला आहे. यासंबंधीचे कुठलेही पुरावे जर समोर आले तर नियमांप्रमाणे कारवाई केली जाईल. संसद म्हणजे लोकशाहीचा सर्वोच्च मंच आहे. या सभागृहात बसणाऱ्या प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचं भान राखलं पाहिजे.














