काँग्रेसचे माजी नेते बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी रात्री उशीरा याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आता अखिलेश यादव यांची निवड करण्यात आली आहे. तर सुफियान मोहसीन हैदर यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. देशातील विविध राज्यांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दिल्ली, गोवा, अंदमान निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.