भारत-चीन सीमावादाच्या मुद्द्यावर संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणावर केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांना या विषयावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे म्हणत, काँग्रेसच्या काळात १९६२ मध्ये भारताने मोठा भू-भाग गमावल्याची आठवण त्यांनी करून दिली. तो भू-भाग आधी परत आणावा किंवा देशाची माफी मागावी, अशी घणाघाती टीका रिजीजू यांनी पत्रकार परिषदेत केली.
राहुल गांधींच्या निराधार दाव्यांवर टीका करताना रिजिजू म्हणाले की, आमच्याकडून देशाच्या भूभागाशी तडजोड कधीही होऊ दिली जाणार नाही; खरं तर, १९५९ पूर्वी आणि १९६२ मध्ये भारताचा भूभाग चीनला देऊन काँग्रेसने केलेल्या पापांबद्दल माफी मागितली पाहिजे. ५०-६० वर्षांपूर्वी काँग्रेसने चीनला दिलेली जमीन ते परत मिळवू शकत नाहीत. जर ते भूतकाळ पूर्ववत करू शकत नसतील तर किमान ते माफी तरी मागू शकतात.” तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची एक इंचही जमीन कोणालाही घेता येणार नाही, असा ठाम विश्वास रिजीजू यांनी व्यक्त केला.
राहुल गांधी यांनी संसदीय शिष्टाचार आणि नियम ३४९ चे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला. सभापतींच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. “आम्हाला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर एकमेकांचे म्हणणे ऐकायचे होते आणि पुढील अजेंड्यावर पुढे जायचे होते, परंतु राहुल गांधी एका विशिष्ट कुटुंबात जन्माला आल्याने ते स्वतःला सभागृह आणि त्याच्या नियमांपेक्षा वरचे समजतात,” असे ते म्हणाले.















