kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज ; दोन मतं देणं अपेक्षित

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी (7 फेब्रुवारी) मतदान होत असून, जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सर्व मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली.

सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागा असून, त्यातील 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार 624 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. सर्व 125 पंचायत समित्या मिळून एकूण 1 हजार 462 जागा असून, त्यातील 731 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण 4 हजार 814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या 25 हजार 471 मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 51 हजार 537 कंट्रोल युनिट आणि 1 लाख 10 हजार 329 बॅलेट युनिटचा समावेश आहे. त्यासाठी सर्व सबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नेहमी एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) मतदान यंत्रावर म्हणजे बॅलेट युनिटवर (बीयू) पांढऱ्या रंगाची; तर पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी बीयूवर गुलाबी रंगाची मतपत्रिका असते. उमेदवारांची संख्या कमी असल्यास एकाच बीयूवर या दोन्ही मतपत्रिका असतात; परंतु उमेदवारांची संख्या अधिक असल्यास आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त बीयूचा वापर केला जातो.

मतदारांचे नाव शोधण्याची सुविधा

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ (Matadhikar) हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्यात मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यावरही मोबाईल ॲपप्रमाणेच मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.

पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होणार आहे या मतदानासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ३६०५ मतदान केंद्रावर एकूण २४ हजार २०५ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. ण्यात शुक्रवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.

पुणे जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकूण २९ लाख ७६ हजार ८०५ मतदार असून, यात १५ लाख २७ हजार १५१ पुरुष तर १४ लाख ४९ हजार ५६० महिला आणि ९४ इतर मतदार आहेत. या मतदानासाठी एकूण ३६०५ मतदान केंद्र असून, यात अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी मिळून एकूण २४ हजार २०५ कर्मचारी तैनात असणार आहेत. मागच्या वेळी ७० टक्के इतकं मतदान झालं होतं. यंदा त्यापेक्षा जास्त मतदान होणार असल्याचा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी व्यक्त केला.

प्रत्येक पंचायत समिती क्षेत्रामध्ये एक आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं आहे. तसंच प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक महिला मतदान केंद्र देखील तयार करण्यात आलं आहे. या केंद्रावर सर्व मतदान कर्मचारी हे महिला असणार आहेत, तर जिल्ह्यात एकूण ६७०१२ दुबार मतदार असून, या दुबार मतदारांची बीएलओमार्फत पडताळणी करण्यात आली आहे. दुबार मतदार हे मतदानासाठी आल्यावर त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात येईल आणि जर चुकीची माहिती दिल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिला.