ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला ‘बिग बॉस’चा एकोणिसावा सिझन अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून विजेत्याचं नाव घोषित होणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात पाच स्पर्धक आहेत. या पाच जणांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस रंगली आहे. हे पाचही स्पर्धक जवळपास 14 आठवड्यांपासून बिग बॉसच्या घरात आहेत. या 14 आठवड्यांसाठी त्यांना चांगलं मानधनसुद्धा मिळालं आहे. शिवाय विजेत्याला तब्बल 50 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये अमाल मलिक, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि ‘तिकिट टू फिनाले’चा विजेता गौरव खन्ना यांचा समावेश आहे. बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी स्पर्धकांना ठराविक मानधन मिळतं. स्पर्धकाच्या लोकप्रियतेनुसार मानधनाचा हा आकडा वेगवेगळा असतो.
‘बिग बॉस 19’मध्ये सर्वाधिक कमावणारा स्पर्धक कोण?
बिग बॉसच्या घरात चौदा आठवडे टिकणं ही काही सहजसोपी गोष्ट नाही. त्यासाठी या स्पर्धकांना शोचे कठोर नियम, नियमांना धरून बनवलेला फॉरमॅट या सर्वांचं काटेकोरपणे पालन करावं लागलं आहे. त्याचसोबत आपल्या खेळीने प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येतील, याचंही भान त्यांना ठेवावं लागलं आहे. ‘बिग बॉस 19’साठी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता गौरव खन्नाला सर्वाधिक मानधन मिळाल्याचं कळतंय. जीके म्हणून ओळखला जाणारा गौरव हा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे ट्रॉफीचा तो प्रबळ दावेदार मानला जात आहे. गौरवला प्रत्येक आठवड्यासाठी जवळपास 17.5 लाख रुपये मानधन मिळत आहे. म्हणजेच चौदा आठवड्यांमध्ये त्याने तब्बल 2.45 कोटी रुपये कमावले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गौरवची एकूण संपत्ती 15 ते 18 कोटी रुपये इतकी आहे.
इतर स्पर्धकांनी किती कमावले?
गौरव खन्नानंतर प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिकला सर्वाधिक मानधन मिळालं आहे. अमालला प्रत्येक आठवड्यासाठी 8.75 लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे चौदा आठवड्यांमध्ये त्याने एकूण 1.225 कोटी रुपये कमावले आहेत. अमाल मलिकची एकूण संपत्ती 25 ते 30 कोटी रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर ग्वालियारची उद्योजिका आणि अध्यात्मिक इन्फ्लुएन्सर तान्या मित्तल आहे. तान्याला प्रत्येक आठवड्यासाठी 3 ते 6 लाख रुपये मानधन मिळतंय. चौदा आठवड्यांमध्ये तिने 42 ते 84 लाख रुपये कमावले आहेत. तान्याची एकूण संपत्ती ही गौरव आणि अमाल यांच्यापेक्षा बरीच कमी आहे. ती 12 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.
फरहाना भट्ट आणि प्रणित मोरे हे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. फरहानाला दर आठवड्यासाठी दोन ते चार लाख रुपये मिळाले. त्यानुसार चौदा आठवड्यांमध्ये तिने 28 ते 56 लाख रुपये कमावले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, फरहानाची एकूण संपत्ती ही शोमध्ये सहभागी झालेल्या सर्व 18 स्पर्धकांपेक्षा कमी आहे. ‘फिल्मीबीट’ने दिलेल्या माहितीनुसार, फरहानाची संपत्ती दीड ते तीन कोटी रुपयांदरम्यान आहे. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सर्वांत कमी मानधन मिळालं आहे. त्याला एका आठवड्यासाठी एक ते दोन लाख रुपये मिळत असून त्याची चौदा आठवड्यांची कमाई 14 ते 28 लाख रुपयांदरम्यान आहे. तर प्रणितची एकूण संपत्ती 4 ते 8 कोटी रुपयांदरम्यान आहे.














