kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच दिवशी वाढदिवस! पवार-फडणवीसांनी एकमेकांना कशा दिल्या शुभेच्छा?

गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्याच्या राजकारणा भूकंप झाला अन् महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले. राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आधीच उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्या गळ्यातही उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

दरम्यान या सर्वांमध्ये विशेष बाब अशी की, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे आज 22 जुलै रोजी असतात. यानिमित्ताने अजित पवार यांनी सकाळीच देवेंद्र फडणवीस यांना एक्सच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

एक्सवर पोस्ट करत अजित पवार यांनी लिहिले की, “माझे सहकारी, मित्र व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपल्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो.”

अजित पवार यांनी दिलेल्या शुभेच्छांनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांची वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट एक्सवर लिहिली. यावेळी फडणवीस म्हणाले की, “राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे सहकारी मित्र अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”

दरम्यान या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकमेकांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्राचे राजकारण 2019 नंतर पूर्णपणे बदलले आहे. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत दुरावा निर्माण झाला होता. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन खळबळ उडवून दिली होती. परंतु अजित पवार यांच्याकडील आमदार शरद पवारांकडे परत फिरल्याने या दोघांनाही दोन दिवसांत राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊनही फडणवीस-पवार यांच्यातील जवळीक मात्र आणखीच वाढत गेली. पुढे गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांनी शरद पवारांशी फारकत घेत 40 आमदारांसह महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान अजित पवार महायुतीत आल्यापासून भाजपमध्ये याबद्दल अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या निर्णयावर टीका केली होती. या सर्व घडामोडी घडत असतानाही भाजपमधून एकमेव देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने अजित पवार यांची पाठराखण करत अजित पवार महायुतीतच राहतील असे ठणकावून सांगत आहे. यावरून दिसते की, राज्याच्या राजकारणात पवार-फडणवीस मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे.