पंजाबमध्ये ८ महापालिका, ७५ नगरपालिका, २० नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी आम आदमी पक्षाची आघाडी होताना दिसत आहे. याठिकाणी AAP ने आतापर्यंत २०३ जागा जिंकल्या आहेत तर दुसऱ्या नंबरवर काँग्रेस आहे. काँग्रेसने ७७ जागांवर विजय मिळवला आहे तर या निकालात भाजपा सर्वात पिछाडीवर आहे. २६ मे रोजी या जागांसाठी मतदान पार पडले होते. ज्याची मतमोजणी आज होत आहे.
पंजाबमधील ११५ मतमोजणी केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, जिथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या निवडणुका केवळ स्थानिक सत्तेसाठीची लढाई नसून २०२७ च्या विधानसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून याकडे पाहिले जात आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी आपल्या सरकारच्या कामगिरीला जनतेची पसंती मिळवण्याची ही एक संधी आहे तर काँग्रेस, भाजपा आणि शिरोमणी अकाली दलही आपली राजकीय स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निकालांमधून राज्याच्या भविष्यातील राजकीय दिशेचे संकेत मिळू शकतात.
हरियाणा नगर परिषद निवडणुकीच्या निकालांनुसार आम आदमी पक्षाने (AAP) ११ पैकी सात प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेसने तीन जागा जिंकल्या तर भाजपाला केवळ १ जागा जिंकता आली आहे.’AAP’ने हरियाणा नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. पंजाबमधील बनूरच्या चारही प्रभागांमधील मतमोजणी पूर्ण झाली असून यामध्ये आम आदमी पक्षाने सर्व जागा जिंकल्या आहेत. पंजाब महानगरपालिका निवडणुकीत आतापर्यंत ३५८ प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. ज्यात आम आदमी पक्षाने १७८, काँग्रेसने ५८ तर शिरोमणी अकाली दलाने ५३ जागा जिंकल्या आहेत. भाजपाने ७, तर अपक्षांनी ६२ जागांवर विजय मिळवला आहे.
लुधियानामध्ये ‘AAP’ सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे परंतु काँग्रेसनेही इथं आपली ताकद दाखवली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लुधियानामध्ये ‘आप’ला फारसे यश मिळालेले नाही. आतापर्यंत ‘आप’ने १८, काँग्रेसने ११, शिरोमणी अकाली दलने ६ आणि भाजपाने १ जागा जिंकली आहे. पंजाबच्या स्थानिक निवडणुकीत आतापर्यंत आप सर्वात मोठा पक्ष बनला आहे तर त्यानंतर काँग्रेसनेही आपली ताकद दाखवली. या निवडणुकीत ‘आप’ने काँग्रेसच्या शहरी मतपेढीत शिरकाव केला आहे. शिरोमणी अकाली दलाने ६६ जागा जिंकल्या आहेत. भाजपाने ११ जागा जिंकल्या आहेत. अपक्ष आणि इतरांनी ७३ प्रभागांमध्ये विजय मिळवला आहे. अद्याप पंजाबमधील निवडणुकीतील मतमोजणी सुरू असून आणखी निकाल हाती लागणे बाकी आहे.
















Leave a Reply