kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मुख्यमंत्री म्हणतात, महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती राहील; मग शाळा बंद का पडल्या? ; संजय राऊत यांचा थेट प्रश्न

महाराष्ट्रातील जवळपास 300 च्या आसपास मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री ओरडून ओरडून सांगताहेत की मुंबई, महाराष्ट्रात मराठी भाषेचीची सक्ती राहील. जर मराठी भाषेची सक्ती राहील असे तुम्ही म्हणताय, तर शाळा बंद का पडल्या? असा थेट प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते.

आज मराठी भाषा गौरव दिन. कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी हा दिवस अनेक वर्षांपासून साजरा केला जातो आणि मराठी भाषेसाठी साहित्य, लेखन, कला, कविता, मराठी नाट्य, मराठी सिनेमा यासाठी हा दिवस प्रेरणादायी आहे. कुसुमाग्रजांनी नाटक लिहिले, कविता लिहिल्या. गद्य, पद्य सर्व लेखन केले.

कालच विधानसभेत एक बातमी पाहिली की, महाराष्ट्रातील जवळपास 300 च्या आसपास शाळा बंद पडलेल्या आहेत आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री ओरडून ओरडून सांगताहेत मुंबईत मराठी भाषेचीच सक्ती राहील. जर मराठी भाषेची सक्ती राहील असे तुम्ही म्हणताय, तर शाळा बंद का पडल्या? याचे उत्तर त्यांनी देणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत. चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत मराठी शाळा बंद पडत आहेत. आदिवासींची मुलं सुद्धा इंग्रजी शाळेत जायला लागली का? हे ढोंग असून मुळात प्रशासनातले बडे अधिकारी, सरकारी कर्मचारी, राजकारणी, सत्ताधारी आमदार, खासदार यांचीच मुलं मराठी माध्यमातून शिकत नसतील तर तुम्ही इतरांना सक्ती करताय ती निरर्थक आहे. आधी तुम्ही तुमच्यापासून सुरुवात का केली नाही? असा सवालही राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांची मुलं कुठल्या शाळेत शिकतात? मी टीका करत नाही, पण मी अभिमानाने सांगतो की, संजय राऊत यांच्या मुली मराठी शाळेतच शिकल्या आणि आम्ही त्यांना हट्टाने मराठी शाळेतच टाकले. अशी किती राजकारण्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवून पुढे नेले, तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. आपण स्वत:च्या घरामध्ये मराठीचे अस्तित्व ठेवायचे नाही आणि राज्यकर्ते म्हणून आम्ही मराठीचे ढोल बडवायचे, हे जोपर्यंत थांबत नाहीतोपर्यंत मराठीची सक्ती या विधानसभेतील घोषणांना काही अर्थ असेल असे मला दिसत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

अभिजात मराठी भाषेचा दर्जा तुम्ही दिला, त्याचा फायदा काय? आजही मराठी भाषा ही व्यापार, उद्योगाची भाषा झालेली नाही. आजही व्यापार, उद्योगाची भाषा गुजरातची, अदानी आणि अंबानीचीच आहे. ती जोपर्यंत पाटील, भोसले, कुलकर्णी, म्हात्रे, राऊत यांची होत नाही तोपर्यंत मराठी भाषेची घोडदौड आणि मराठी माणसाची घोडदौड होणार नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याचसाठी शिवसेनेची स्थापना केली. राजकारणात आणि प्रशासनामध्ये मराठी भाषा राहिली तर मराठी माणूस उद्योग, व्यवसायात टिकेल. मराठी माणसाला रोजगार मिळेल, नोकरी मिळेल. आज मराठीशिवाय मुंबईत सगळ्यांना नोकऱ्या मिळत नाही. मराठी माणसाला मिळत नाही. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी… पाहुण्यांना येऊ द्या पण पाहुण्यांनी महाराष्ट्राचे मालक होऊ नये एवढीच अपेक्षा आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.