kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

MPSC परीक्षेत पुन्हा गोंधळ! १२ प्रश्न रद्द तर २ उत्तरांमध्ये बदल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र गट – ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (मुख्य) परीक्षा – २०२४ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली. या उत्तरतालिकेत दोन्ही पेपरमधील मिळून तब्बल १२ प्रश्न रद्द करण्यात आले असून, इंग्रजी विषयातील २ प्रश्नांची उत्तरे बदलण्यात आली आहेत. यामुळे एकूण १४ प्रश्नांवर परिणाम झाला आहे, ज्यांचे २८ गुण (प्रत्येक प्रश्न २ गुणांचा) विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम करणार आहेत. या प्रकारामुळे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

एमपीएससीने २०२५ पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा पद्धती अवलंबण्याचा दावा केला आहे. तसेच २०२५ मध्ये होणारी राज्यसेवा परीक्षा ही यूपीएससीच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे बदल दिसत नाहीत. यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल २० दिवसांत जाहीर करते, तर एमपीएससीच्या प्रक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागतो. यामुळे मुख्य परीक्षेच्या तयारीवर परिणाम होतो. अचानक १०-१५ प्रश्न रद्द झाल्याने अनेक विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडतात, ज्याचा मनोबलावर विपरीत परिणाम होतो. यापूर्वीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ मध्येही २० प्रश्न रद्द आणि १३ प्रश्नांची उत्तरे बदलण्यात आली होती, यामुळे एमपीएससीच्या प्रक्रियेची विश्वासार्हता प्रश्नांकित झाली आहे.

एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये शुद्धलेखन आणि भाषांतराच्या चुका मोठ्या प्रमाणात आढळतात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असतानाही, प्रश्नपत्रिकांमधील मराठीतील चुका आणि गुगल ट्रान्सलेटवर अवलंबून असलेले अयोग्य भाषांतर यामुळे प्रश्न रद्द करावे लागतात किंवा उत्तरे बदलावी लागतात. याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसतो. दोन उत्तरतालिका प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यासाठी असल्याचा दावा आयोगाकडून केला जातो, परंतु या प्रक्रियेला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते.