kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पूरग्रस्त महाराष्ट्राला सर्वाधिक १४९२ कोटींचा अग्रिम वितरित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नरेंद्र मोदी व अमित शहांचे आभार

केंद्रीय गृहमंत्रालयाने अतिवृष्टी व पूरामुळे बाधित देशातील १४ राज्यांना केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून ५ हजार ८५८ कोटी ६० लाख रुपयांचा अग्रिम निधी वितरीत केल्याबद्दल तसेच त्यापैकी सर्वाधिक १ हजार ४९२ कोटी रुपये महाराष्ट्राला मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

नुकत्याच वितरीत झालेल्या निधीसह केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून संबंधित २१ राज्यांना यावर्षी आतापर्यंत एकूण १४ हजार ९५८ कोटींची मदत करण्यात आली आहे. ही बाब आपत्ती निवारणाच्या कार्यात केंद्रसरकार राज्यसरकारांच्या विशेष करुन महाराष्ट्रवासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचे दाखविणारी आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

केंद्रीय आपत्ती निवारण निधीतून महाराष्ट्राला १४९२ कोटी, आंध्रप्रदेशला १०३६ कोटी, आसामला ७१६ कोटी, बिहारला ६५५ कोटी ६० लाख, गुजरातला ६०० कोटी, तेलंगनाला ४१६ कोटी ८० लाख आणि पश्चिम बंगालला ४६८ कोटींचा अग्रिम निधी वितरीत करण्यात आला आहे.