आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची उद्या (12 मार्च) 113 वी जयंती आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता प्रीतिसंगावरील समाधीस्थळी आदरांजली वाहणार आहेत. यंदा प्रीतिसंगमावर अजितदादांची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवणार आहे. यशवंतरावांच्या पुण्यतिथी आणि जयंतीला अजित पवारांची प्रीतिसंगमावर हमखास उपस्थिती असायची. यंदा अजितदादा प्रीतिसंगमावर असणार नाहीत. परंतु, सुनेत्रा पवार पुण्याहून मोटारीने कराडला येऊन प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी आदरांजली वाहणार आहेत.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी कृषी, सहकार आणि औद्योगिक क्षेत्राच्या माध्यमातून आधुनिक महाराष्ट्राचा पाया घातला. महाराष्ट्राचा समतोल विकास साधला. म्हणूनच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि लोकनेते म्हटले जाते. देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण, अर्थ आणि गृहमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती.
यशवंतरावांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी देवराष्ट्रे (जि. सांगली) येथे झाला. कातांतराने त्यांचे कुटुंब कराडला आले. कराडच्या मातीत त्यांचे बालपण गेले. विद्यार्थी दशेतच ते स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी झाले. त्यांची सामाजिक, राजकीय जडणघडण कराडमध्येच झाली. त्यांच्या प्रेरणेनेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी होती. कराडमधून राजकारणाचा श्रीगणेशा करून नंतर त्यांनी सातारा जिल्हा, राज्य आणि पुढे देशाचे नेतृत्व केले. स्वच्छ चारित्र्याचा निष्कलंक नेता म्हणून त्यांची जनमानसात प्रतिमा होती. त्याच पावलावर पाऊल टाकत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत अजित पवार यांनी वाटचाल केली. यशवंतरावांनी घालून दिलेल्या आदर्श मुल्यांची त्यांनी जपणूक केली.













