हिंदू धर्मियांच्या महत्वाच्या सणांपैकी एक म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने अष्टविनायक गणपतींबद्दल जाणून घेऊया

अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपती देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक. अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतींची माहिती

१) मोरगांव :

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. गाणपत्य संप्रदायाचे हे महत्त्वाचे स्थान आहे. या गणपतीस मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू आणि आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. मोरगाव गणेश मंदिर हे आदिलशाही काळात पराक्रमी सुभेदार गोळे यांनी बांधले आहे, त्यांचे वंशज पिरंगुट या गावी आजही राहतात.

स्थान- ता. बारामती, जि. पुणे
अंतर- पुणे-सासवड-मोरगाव ६४ कि.मी, पुणे-चौफुला-मोरगाव ७७ कि.मी, मुंबई २२५ कि.मी

२) थेऊर :

अष्टविनायकांपैकी थेऊरचा चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.

स्थान- ता.हवेली, जि.पुणे
अंतर- थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. थेऊर फाटा ते थेऊर ५ कि.मी, मुंबई १९१ कि.मी

३) सिद्धटेक :

सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत.

स्थान- पो. जलालपूर, ता. कर्जत, जि. अहमदनगर
अंतर- सिद्धटेकला यात्रेकरूंना सोयीचे रेल्वेस्टेशन म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने गाडीने थेट मंदिरापर्यंत जाता येते.
दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गाने जाता येते. पुण्याच्या शिवाजीनगर एस.टी. स्थानकापासून दुपारी तीन वाजता थेट सिद्धटेकची बस आहे.
पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे.

४) रांजणगाव :

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. हे महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न आणि मनमोहक अशी गणपतींची मूर्ती आहे.

स्थान- ता. शिरूर जि, पुणे हे स्थान पुणे-अहमदनगर राज्य महामार्गावर आहे.
अंतर- रांजणगाव-पुणे ५० कि.मी, रांजणगाव-शिरुर १७ कि.मी, जवळच्या न्हावेरपासून पुणे-सोलापूर मार्गावरील चौफुला येथे जाता येते. चौफुल्याहून थेऊर, मोरगाव व सिद्धटेकला जाता येते.

५) ओझर :

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील गणपतींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न आणि मंगल मूर्ती असलेला गणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

स्थानः ता.जुन्नर जि.पुणे
अंतरः पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र.५० वरील नारायणगावपासून व आळे फाट्यापासून जवळ. कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वरील मढपासूनजवळ. ओझर ते लेण्याद्री १७ कि.मी मार्गे जुन्नर

६) लेण्याद्री :

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज. किल्ले शिवनेरीच्या सान्निध्यात, जुन्नर तालुक्यातील प्राचीन जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत आणि त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.

स्थान- पोस्ट गोळेगाव, ता.जुन्नर जि.पुणे
अंतर- मुंबई-कल्याण-माळशेजघाट-मढ-लेण्याद्री १८० कि.मी, पुणे-नारायणगाव-जुन्नर-लेण्याद्री १४० कि.मी
लेण्याद्रीपासून इतर अष्टविनायकांचे अंतर- ओझर १७ कि.मी, रांजणगाव १२० कि.मी, मोरगाव १५५ कि.मी, थेऊर १३२ कि.मी, सिद्धटेक १८० कि.मी, महड १३५ कि.मी, पाली १७५ कि.मी

७) महाड :

महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे आणि त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला आणि मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे आणि उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. रायगड जिल्ह्यातील महाड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

८) पाली :

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी आणि अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे आणि सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *