kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्याला लाखो भाविकांची मांदियाळी; दीड हजार भजनी दिंड्या शेगावमध्ये दाखल

श्री संत गजानन महाराज यांच्या 148व्या प्रकट दिन सोहळ्याला बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी दिसत आहे. रविवारी (8 फेब्रुवारी 2026) हा पावन दिवस साजरा होत आहे. यासाठी देशभरातून आणि परदेशातूनही असंख्य भक्त दर्शनासाठी दाखल झाले आहेत. शेगाव हे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणानं दुमदुमलं आहे.

श्री संत गजानन महाराज हे दत्तसंप्रदायातील महान योगी आणि अवलिया संत म्हणून पूजले जातात. 1878 मध्ये माघ वद्य सप्तमीला शेगावमध्ये ते प्रथम दिसले. तेव्हापासून हा दिवस ‘प्रकट दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा मंत्र ‘गण गण गणात बोते’ हा जगभरातील भक्तांच्या ओठावर आहे. महाराजांनी साधेपणा, भक्तिमार्ग, संयम आणि नि:स्वार्थ सेवेचा आदर्श घालून दिला. या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त शेगावच्या श्री गजानन महाराज समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जात आहेत. अभिषेक, पालखी सोहळा, भजन-कीर्तन, सामुदायिक पारायण आरती आणि मंत्रघोष यांचा समावेश आहे. आजही दर्शन रात्रभर सुरू राहणार आहे. समाधी दर्शनासाठी 5 ते 6 तास लागत असले तरी भाविक अत्यंत नम्रतेनं, शांततेनं आणि शिस्तीनं रांगा लावून दर्शन घेत आहेत. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार आहे.

या वर्षी दीड हजारांहून अधिक भजनी दिंड्या राज्यभरातून पायी चालत शेगावमध्ये दाखल झाल्या आहेत. लाखो भाविकांची गर्दी पाहता, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनानं संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त लावला आहे. वाहतूक नियंत्रण, सुरक्षा व्यवस्था आणि महाप्रसाद वाटपाचीही उत्तम व्यवस्था संस्थाकडून केली आहे.