kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

खासदार सुप्रिया सुळेंकडून बारामतीमधून निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या विरोधात नकोच, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या. मी यापुढे पवार कुटुंबीयांच्या विरोधात कधीही निवडणूक लढणार नाही. मागच्यावेळीही माझी बारामतीतून लढण्याची इच्छा नव्हती. पण त्यावेळी कारणं वेगळी होती. आता मात्र, मी कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात लढणार नाही. मी दुसरा मतदारसंघ बघणार आहे. कुटुंबातील दुसऱ्या कुणाला बारामतीतून लढायचं असेल तर त्यांनी लढावं, मी मात्र, लढणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच पवार कुटुंबीय कालही एक होतं. आजही एक आहे. त्यामुळे 2029मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी 2029मध्ये पवार विरुद्ध पवार अशी कोणतीही लढत होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनीही घेतलेली सकारात्मक भूमिका आहे. कुठल्याही कुटुंबामध्ये वाद असू नये, अशी माझी भूमिका आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशी सर्व राष्ट्रवादी पवार कुटुंबीयांची आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रियाताई सुळे करत आहेत. सुप्रिया सुळे या संवेदनशील आहेत. कुठेही कुटुंब राजकारणामुळे दुभंगू नये, अशी माझी वैयक्तिक भावना आहे, असं उदय सामंत म्हणाले.

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यावर भाष्य केलं आहे. आपली हिंदू आणि भारतीय संस्कृती आहे. एकमेकांचा विचार करण्याची संत महंतांनी आपल्याला शिकवण दिली आहे. एकमेकांच्या भावनांचा विचार करण्याची आपली संस्कृती आहे. आपल्या स्वार्थाच्या पुढे कुटुंबाचे हित पाहणे हीच आपली संस्कृती आहे, असं सांगत त्यामुळे येथून पवार कुटुंबाच्या विरोधात बारामतीमधून निवडणूक न लढण्याचा सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *