बकरी ईदनंतर पारंपरिक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या “बासी ईद” निमित्त अनेक मुस्लिम कुटुंबे शहरातील बागा, उद्याने व पर्यटनस्थळांना भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सारसबाग २८ व २९ मे २०२६ रोजी बंद ठेवण्याच्या निर्णयावर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. फरहा अनवर हुसेन शेख तसेच सामाजिक कार्यकर्ते अनवर हुसेन शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सारसबाग बंद ठेवण्यामागील कारणे प्रशासनाने स्पष्ट करावीत. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय घेतला असल्यास, त्याच कालावधीत शहरातील इतर बागांबाबत वेगळी भूमिका का घेतली जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
निवेदनानुसार, “बासी ईद” निमित्त सारसबागेला भेट देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून, सार्वजनिक ठिकाणे सर्व नागरिकांसाठी समान हक्काने खुली असली पाहिजेत. सुरक्षेच्या कारणास्तव काही अडचणी असल्यास प्रशासनाने पोलीस बंदोबस्त व अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था वाढवावी; मात्र विशिष्ट समाजाच्या पारंपरिक कौटुंबिक भेटींवर अप्रत्यक्ष निर्बंध येतील असे निर्णय टाळावेत, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.
फाउंडेशनच्या वतीने पुणे महानगरपालिका प्रशासन, उद्यान विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. फरहा शेख यांनी सांगितले की, “सार्वजनिक स्थळांबाबत घेतले जाणारे निर्णय सर्वसमावेशक आणि पारदर्शक असणे आवश्यक आहे. कोणत्याही समाजात गैरसमज किंवा भेदभावाची भावना निर्माण होणार नाही, याची प्रशासनाने काळजी घ्यावी.”
दरम्यान, प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत भूमिका स्पष्ट होणे अपेक्षित असल्याचेही फाउंडेशनच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
















Leave a Reply