राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाणार आहे.
खासदार शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. कफ झाल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास होत आहे. याच कारणामुळे त्यांना बारामतीतून तातडीने पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या प्राथमिक तपासण्या केल्या आहेत. असे असतानाच आता पवार कुटुंबातील सदस्य तथा आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. सोबतच त्यांनी राज्यभरातील राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट) नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कोणीही पुण्यात शरद पवार यांना भेटण्यासाठी येऊ नये, असे आवाहन केले आहे.
यावेळी बोलताना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले आहे. “मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कोणीही हॉस्पिटलला येऊ नये. रुग्णालयात इतरही काही रुग्ण आहेत. डॉक्टरांनी सांगितले सांगितल्याप्रमाणे शरद पवार हे आयसीयूमध्ये नाहीयेत. एका प्रायव्हेट रुममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी स्वत:चर्चा करून आलेलो आहे. त्यामुळे चिंतेचं कोणतंही कारण नाहीये. गेल्या 12 ते 13 दिवसांत शरद पवार यांचा शारीरिक ताण वाढला आहे,” असे रोहित पवार यांनी सांगितले.
तसेच, पवार साहेब यांना कफ झालेला आहे. पुढच्या काही काळात रिपोर्ट येतील. माझ्या अंदाजाप्रमाणे शरद पवार साहेबांना रुग्णालयातच एक ते दोन दिवस ठेवलं जाईल. कृपा करून इतर रुग्णांच्या हितासाठी कोणीही रुग्णालयात येऊ नये. पवार साहेबांशी कोणालाही भेटता येणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.












