मी जेव्हा मंत्री झालो होतो, तेव्हा मला एकच खाते मिळाले होते. आज माझा मुलगा योगेश कदम एकाच वेळी पाच-पाच खाती सांभाळत आहे. भविष्यात एकनाथ शिंदे यांनी कुठलीही जबाबदारी दिली, तर योगश कदम समर्थपणे सांभाळू शकतात, अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिली.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वाढदिवस मुंबईतील त्यांच्या पालखी बंगल्यात साजरा करण्यात आला. या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी रामदास कदम यांनी मुलाविषयीच्या भावना व्यक्त केल्या. मी भाग्यवान आहे की योगेश आणि सिद्धेश यांच्यासारखे मला चिरंजीव आहेत. योगेश कदम यांचे काम संपूर्ण राज्य बघत आहे. योगेश कदम हे जेव्हा विधिमंडळात असतात तेव्हा विधिमंडळातील माझे जुने सहकारी मला फोन करून सांगतात. योगेश कदम यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे, त्यांच्यात उत्तर देण्याची परिपक्वता आहे, असे मला फोन करून सांगितले जाते, अशी आठवण रामदास कदम यांनी सांगितली.
माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा योगेश कदम यांच्या मातोश्री ज्योती कदम यांनी व्यक्त केली आहे. मला माझ्या मुलाचा खूप अभिमान आहे. बापसे बेटा सवाई असा जो प्रकार असतो तोच इथे झाला आहे. तसेच माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे, असेही योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मी आज आई-वडिलांच्या आणि जनतेच्या आशीर्वादामुळेच इथपर्यंत पोहोचलो आहे. राजकारणात पुढे पाऊल टाकत असताना जनतेच्या आधाराशिवाय पुढे जाता येत नाही. मी नशीबवान आहे की, मला हजारो जनतेचा आशीर्वाद मिळत आहे. तसेच जनतेचे आशीर्वाद घेऊन मी भविष्यात काम करणार आहे, अशा शब्दांत योगेश कदम यांनी प्रतिक्रिया दिली.















