kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे; व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी व्लादिमीर पुतिन यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत पुतिन यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची द्वीपक्षीय चर्चा आणि भारत- रशियाच्या संबंधांचे भविष्य याबाबत प्रश्न विचारण्यात आले. या मुलाखतीत पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं. जगानं भारताचं ठाम धोरण पाहिलं आहे. देशाला आपल्या नेतृत्त्वावर अभिमान असला पाहिजे, असं पुतिन म्हणाले. पुतिन यांनी हे देखील सांगितलं की भारत आणि रशियातील 90 टक्क्यांहून अधिक द्वीपक्षीय व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाले आहेत.

व्लादिमीर पुतिन यांनी त्यांचे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी भारताचा दौरा करत असल्यानं आनंद असल्यचं म्हटलं. पुढील बैठक भारतात आयोजित करण्यास दोन्ही नेत्यांची सहमती असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

पुतिन यांनी अनेक गोष्टींवर चर्चा होणार असल्याचं म्हटलं. भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्याची व्याप्ती मोठी आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध देखील त्यांनी अधोरेखित केलं. भारतानं स्वातंत्र्यानंतर केलेल्या प्रगतीचं पुतिन यांनी कौतुक केलं. स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांच्या कमी वेळात भारतानं अद्भुत विकास केल्याचं पुतिन म्हणाले.

व्लादिमीर पुतिन यांनी नऊ वेळा भारताचा दौरा केला आहे. त्यापैकी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात तीनवेळा (2016,2018 आणि 2021) पुतिन भारतात आले. डिसेंबरमध्ये हा त्यांचा दहावा दौरा असेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातवेळा रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत.

व्लादीमीर पुतिन आज राजधानी नवी दिल्लीत सांयकाळी साडे वाजता दाखल होतील. 23 व्या भारत रशिया वार्षिक समिटसाठी पुतिन दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करतील. याशिवाय ते राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करतील. रशिया यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर व्लादीमीर पुतिन पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ते यापूर्वी डिसेंबर 2021 ला भारताच्या दौऱ्यावर आले होते.

पुतिन यांच्या दौऱ्याचं वेळापत्रक

4 डिसेंबर 2025

सांयकाळी 6.35 ला नवी दिल्लीत आगमन

5 डिसेंबर 2025

सकाळी 11 वाजता : राष्ट्रपती भवनात स्वागत कार्यक्रम

सकाळी 11.30 वाजता : राजघाटावर महात्मा गांधी यांना अभिवादन

सकाळी 11.50 वाजता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत हैदराबाद हाऊसला चर्चा

1.50 : प्रेस स्टेटमेंट

सायंकाळी 7 वाजता : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

रात्री 9 वाजता : रशियाकडे प्रस्थान