केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगड दौऱ्यावर असून, त्यांनी राज्यातील नक्षलवादावर मोठे विधान केले आहे. रायपूरमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की, सुरक्षा-केंद्रित रणनीती, पायाभूत सुविधांचा विकास आणि नक्षलवाद्यांच्या आर्थिक नेटवर्कवर केलेल्या कारवायांमुळे नक्षलवाद आता शेवटच्या टप्प्यात असून, ३१ मार्चपूर्वी तो पूर्णपणे संपवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमित शाह यांनी छत्तीसगड सरकार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नक्षलविरोधी कारवायांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीनंतर ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांनी लिहिले की, “एकेकाळी नक्षलवादाचा गड असलेले छत्तीसगड आता डबल इंजिन सरकारच्या काळात विकासाचे केंद्र बनले आहे. राज्यातील तरुण आता शस्त्रे सोडून क्रीडा, फॉरेन्सिक आणि तांत्रिक शिक्षणाकडे वळत आहेत.”
रायपूरमधील “छत्तीसगड २५: शिफ्टिंग द लेन्स” या राष्ट्रीय परिषदेत बोलताना अमित शाह म्हणाले की, भारत जागतिक स्तरावर यशस्वी होत असताना त्याचा फायदा फक्त देशालाच नाही तर संपूर्ण जगाच्या समृद्धी आणि सुरक्षिततेला होतो. आज जग भारताकडे सुरक्षा आणि स्थिरतेचा आधारस्तंभ म्हणून पाहत आहे, असे यावेळी त्यांनी नमूद केले.
काँग्रेसवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, बरेच लोक प्रशासनाला केवळ प्रशासकीय प्रक्रिया मानतात, परंतु माझ्याकडे त्यांच्यासाठी एक उदाहरण आहे. जेव्हा छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंडसाठी चळवळी सुरू होत्या, तेव्हा काँग्रेस सरकार देशावर राज्य करत होते. त्यांनी नमूद केले की, गेल्या तीन दशकांत राज्यांची पुनर्रचना दोन वेळा झाली. एक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या कार्यकाळात आणि दुसरे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात. दोन्ही प्रकरणांमध्ये, राज्यांची पुनर्रचना करण्यात आली.















