kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘पार्ट टाईम नेते पंतप्रधान मोदींवर टीका करतात’ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

“देशावर संकट असताना विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले पाहिजेत. मात्र सध्याचे पार्ट टाईम नेते पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत,” असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला. “हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं शेतकऱ्यांना पिक विमा देणार आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अहमदपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर 28 मे रोजी रात्री 8 वाजता आयोजित भव्य शिवसेना पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या ऐतिहासिक मेळाव्यात लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

“सध्याचे पार्ट टाईम नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. पण देशावर संकट असताना विरोधक आणि सत्ताधारी एकत्र आले पाहिजेत,” अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. “आता निवडणुका संपल्या असून कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना वाढवावी. जो काम करेल तोच पुढं जाईल आणि शिवसेना मोठी झाली, तरच कार्यकर्त्यांना न्याय मिळेल,” असं आवाहन त्यांनी केलं.

यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची मोठी रिघ लागली. गोरगरिबांचे नेते बच्चू कडू यांच्यासह अनेक माजी मंत्री आणि माजी आमदार आपल्यासोबत येत आहेत. आपण विकासाचा अजेंडा घेऊन पुढं चाललो असून विकासाचं राजकारण कुठं आहे ते आता सर्वांना कळालं आहे.” ‘एक बार मैंने कमिटमेंट कर दी, तो मैं खुद की भी नहीं सुनता,’ या खास शैलीत त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केलं. “एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून 2022 मध्ये आपलं सरकार आलं आणि मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना आणण्याचं भाग्य मला लाभलं. मी स्वतः गरिबी पाहिली असल्यानं मला याचा मनापासून आनंद आहे. अनेक लोक कोर्टात गेले, तरीही आपण खंबीरपणे उभं राहिल्यामुळे ही योजना बंद झाली नाही. हा एकनाथ शिंदे शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं शेतकऱ्यांना पिक विमा देणार आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

“आपण सरकारमध्ये असल्यानं अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांची कामं केलीच पाहिजेत,” असे आदेश देत चांगला पाऊस होऊ दे आणि शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, अशी देवाकडं त्यांनी प्रार्थना केली. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून इथं कोणीही मालक नाही. आपल्याला गोरगरीब जनतेसाठी काम करायचं असून खुर्ची हा आपला अजेंडा नाही. ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. बाळासाहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करत आहोत. सद्यस्थितीत डिझेल-पेट्रोलची कमतरता असली तरी कोणीही साठेबाजी करता कामा नये. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात पत्रकारांशी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आणि मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील माध्यम प्रतिनिधींना पोलिसांनी अडवत हुज्जत घातल्यानं प्रसारमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी तसेच संताप व्यक्त होत आहे. कार्यक्रमस्थळी अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले, किनगावचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना रोखत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रकारांनी आपलं कर्तव्य पार पाडत उपमुख्यमंत्र्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांकडून झालेल्या या वर्तणुकीमुळे संतापाची लाट उसळली. विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या कानावर पत्रकारांनी घातला. मात्र, त्यांनी माध्यम प्रतिनिधींचं म्हणणं फक्त ऐकून घेतल्याचं सांगितलं जात असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीही तत्काळ कारवाई अथवा स्पष्ट भूमिका समोर आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *