kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली ‘दारुम डॉल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, शुक्रवारी टोक्यो येथील शोरिन्जान दारुमा-जी मंदिराचे मुख्य पुजारी रेव सेइशी हीरोसे यांनी पंतप्रधान मोदींना एक खास भेट दिली. ही भेट म्हणजे ‘दारुम डॉल’ आहे. ही बाहुली जपानी संस्कृतीत सौभाग्य आणि यशाचे प्रतीक मानली जाते. विशेष म्हणजे या बाहुलीचा भारताशी खोलवर संबंध आहे. या विशेष भेटीच्या निमित्ताने ‘दारुम डॉल’ नेमकी काय आहे आणि तिचा भारताशी काय संबंध आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

दारुम डॉल’ ही एक गोल, पोकळ आणि हात-पाय नसलेली पारंपारिक जपानी बाहुली आहे. ही बाहुली भारतीय बौद्ध भिक्खू बोधिधर्म यांच्यावर आधारित आहे. ही बाहुली प्रामुख्याने लाल रंगाची असते, कारण लाल रंग हा आशियाई संस्कृतीमध्ये सौभाग्य, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानला जातो. ‘दारुम डॉल’चा संबंध थेट भारतातील बौद्ध भिक्खू बोधिधर्म यांच्याशी जोडला जातो. असे मानले जाते की, बोधिधर्म दक्षिण भारतातून चीन आणि त्यानंतर जपानमध्ये गेले, आणि त्यांच्यामुळेच तिथे झेन बौद्ध धर्माची परंपरा सुरू झाली.

जपानमध्ये त्यांना ‘दारुमा’ या नावाने ओळखले जाते आणि याच नावावरून या बाहुलीला ‘दारुम डॉल’ असे नाव मिळाले. यामुळे, ही बाहुली केवळ जपानी संस्कृतीचा भाग नसून, तिची मुळे थेट भारतातील बौद्ध धर्माशी जोडलेली आहेत.

जपानमध्ये अशी एक मान्यता आहे की, जेव्हा एखादे ध्येय निश्चित केले जाते, तेव्हा ‘दारुम डॉल’च्या एका डोळ्याला रंग भरला जातो. आणि जेव्हा ते ध्येय पूर्ण होते, तेव्हा दुसऱ्या डोळ्याला रंग भरला जातो. ही प्रक्रिया केवळ इच्छापूर्तीचे प्रतीक नाही, तर जीवनात संयम आणि निरंतर प्रयत्नांचे महत्त्वही शिकवते.

या बाहुलीचा पाया गोलाकार आणि वजनदार असतो, ज्यामुळे ती खाली पडली तरी पुन्हा उभी राहते. यामुळेच ‘सात वेळा पड, पण आठव्यांदा उठ’ या जपानी म्हणीशी तिचा संबंध जोडला जातो.

दारुम डॉल’ निर्मितीचे सर्वात मोठे केंद्र जपानमधील ताकासाकी शहर आहे, जिथे १६९७ मध्ये शोरिन्जान दारुमा मंदिराची स्थापना झाली. या मंदिरातच ही बाहुली बनवण्याची परंपरा सुरू झाली. दरवर्षी येथे ‘दारुमा उत्सव’ साजरा केला जातो, ज्यात हजारो लोक नवीन बाहुल्या खरेदी करतात आणि जुन्या परत देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.