मनोरंजन विश्वातून एक अत्यंत खळबळजनक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि विकी कौशल स्टारर ‘छावा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी तरुण अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्या केली आहे. नालासोपारा येथील घरात कोणी नसताना संचिताने छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आपले जीवन संपवले. लहान बहीण घराबाहेर गेली असताना तिने हे टोकाचं पाऊल उचललं. ही घटना रविवारी संध्याकाळी ६:३० ते ७:३० च्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता नालासोपारा येथील आचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपले आई-वडील आणि बहिणीबरोबर राहत होती. ही घटना घडली तेव्हा ती घरात एकटीच होती. संचिताने बेडरुममध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. संचिता आपली आई-वडील आणि १५ वर्षांच्या लहान बहिणीबरोबर राहत होती. रविवारी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास तिची लहान बहीण अंजली काही कामासाठी घराबाहेर गेली होती. घरात कोणीही नसताना संचिताने हे टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबीयांनी स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
संचिता टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने ‘दिलवाली दूल्हा ले जाएगी’ या चित्रपटात ‘सुकून’ नावाची भूमिका केली होती. त्याचबरोबर तिने विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटात ‘ताराबाई’ ही भूमिका साकारली होती. संचिताने ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागले की दुनिया’ यांसारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं.
संचिता उगलेने आत्महत्या नेमकी का केली, यामागचे खरे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आचोले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलीस कुटुंबीय आणि जवळच्या लोकांची चौकशी करून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.














