शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार फुटणार असून, ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्रीवर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते. या सर्व घडामोडींवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा केला.
“ऑपरेशन रुग्णालयात होतं. राजकीय लोकं कधीपासून हातात कैची आणि सुरी घेऊन ऑपरेशन करायला लागले माणसांची खरेदी-विक्री करणं याला फोडाफोडी म्हणतात. महाराष्ट्र आणि देशात गेल्या बारा वर्षांत यापेक्षा वेगळं काही झालं नाही. तृणमूल काँग्रेसचे काही खासदार गेले. नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश झाला. पण, शिवसेनेच्या बाबतीत या बातम्या चुकीच्या आहेत,” असं स्पष्टीकरण खासदार संजय राऊत यांनी दिलं.
“जे खासदार त्या (रविवारी) दिवशीच्या बैठकीत सहभागी झाले होते, त्यांनी आई भवानीची शपथ घेत सांगितलं “साहेब, आम्ही तुमच्याबरोबरच आहोत”, कोणी मुलाची शपथ घेतली, तर कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजाभवानीची शपथ घेतली, तर कोणी साईबाबांची शपथ घेतली. या शपथा त्यांनी स्वतः घेतलेल्या असल्यामुळं आणि ते हिंदुत्ववादी असल्याने ते हिंदुत्वाचे पालन करतील,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
रविवारी मातोश्रीवरील बैठकीत पाच खासदार उपस्थित राहिले, तर चार खासदार ऑनलाइन उपस्थित होते. त्यानंतर खासदार संजय देशमुख यांनी दिल्ली गाठून केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांचा संवाद कमी पडतो आहे का, याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, आमच्याकडे ईडी असती तर धाक कायम आला असता. सध्या धाक म्हणजे मोदींचा धाक, अमित शाहांचा धाक. एखाद्या मंत्र्याला खासदार भेटला तर त्यात विशेष काय? उद्या कामानिमित्त मी पंतप्रधानांनाही भेटू शकतो.












