संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत चर्चेला सुरुवात करत, भारतीय लष्कराच्या शौर्याचे कौतुक केले आणि या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी व त्यांचे सूत्रधार मारले गेल्याची माहिती दिली.देश की सेना शेर है, अशा शब्दात सिंह यांनी लष्कराचे कौतुक केले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा दावाही त्यांनी फेटाळला. लोकसभा आणि राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधक या संवेदनशील विषयावर आमनेसामने आले असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेची सुरुवात करताना ‘ऑपरेशन सिंदूर’मागील भूमिका आणि त्याचे परिणाम सविस्तरपणे सभागृहासमोर मांडले. त्यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या पराक्रमाचे कौतुक करत पाकिस्तानलाही खडे बोल सुनावले.
प्रत्युत्तराची कारवाई: “पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच आपल्या सशस्त्र दलांनी कारवाई केली. दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर (इन्फ्रास्ट्रक्चर साईट्स) अचूक हल्ले चढवण्यात आले, ज्यात १०० हून अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि सूत्रधार (हँडलर्स) लक्ष्य ठरले,” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. तसेच,अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यालाही राजनाथ सिंह यांनी फेटाळून लावले. “‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवण्यासाठी भारतावर कोणताही आंतरराष्ट्रीय दबाव नव्हता,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले की, “पाकिस्तानने भारतीय लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण S-400 आणि इतर हवाई संरक्षण प्रणालींनी तो पूर्णपणे अयशस्वी ठरवला. आपले कोणतेही महत्त्वाचे नुकसान झाले नाही.”











