महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे. भाजपाने या मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने राज्यातील २२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही त्यापैकीच एक जागा आहे. मात्र महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांच्या अनेक पारंपरिक जागा भाजपासाठी सोडल्या आहेत. महायुतीत शिंदे गटाला केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागांसाठी शिंदे गट अग्रही होता. मात्र आता शिंदे गटाने या मतदारसंघातूनही माघार घेतली आहे. भारतीय जनता पार्टीने नारायण राणे यांना येथून लोकसभेचं तिकीट दिलं आहे.
देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला उद्यापासून (शुक्रवार, १९ एप्रिल) सुरुवात होत आहे. उद्या पहिल्या टप्यातील मतदान होणार आहे. निवडणूक तोंडावर आली तरी महायुतीतल्या पक्षांमध्ये अनेक जागांवरून निर्माण झालेला तिढा काही अद्याप सुटलेला नाही. दरम्यान, महायुतीतल्या नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सोडवण्यात यश मिळवलं आहे. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये ही जागा संयुक्त शिवसेनेने लढवली होती. शिवसेनेचे विनायक राऊत दोन्ही निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून निवडून आले होते. दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पक्षाचे १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर गेले. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पाच खासदारांनी उद्धव ठाकरेंबरोबर थांबण्याचा निर्णय घेतला. शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा लढवत आली आहे. हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने यंदादेखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र शिंदे गटाने आता माघार घेतली आहे. भाजपाने या मतदारसंघातून नारायण राणे यांना उमेदवारी दिली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात पाय रोवण्याचा भाजपाचा मनसुबा असल्याने या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सुरुवातीपासून येथे उमेदवारीसाठी शिंदे गटावर दबाव ठेवला होता. त्याचबरोबर पक्षातर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी आमदार प्रमोद जठार इत्यादी नावे उमेदवार म्हणून सतत चर्चेत ठेवली होती. त्यापैकी राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार असतील असं जाहीर केलं. तसेच या निवडणुकीत आम्ही राणेंचा प्रचार करू असंही सामंत बंधूंनी स्पष्ट केलं.