kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत”; मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात शोकप्रस्ताव

महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ आजपासून सुरु होत आहे. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. अधिवेशनापूर्वी रविवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या चहापाणाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. तर आज “दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत, हा प्रस्ताव मांडण्याचा प्रसंग आपल्यावर केव्हा येईल असे वाटले नाही”, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात शोकप्रस्ताव मांडला.

“अजित पवार महाराष्ट्राला न लाभलेले उत्कृष्ट मुख्यमंत्री होते. भविष्यात त्यांच स्वप्न कधीतरी पूर्ण झालं असतं”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. फडणवीस म्हणाले की, दादांचे निधन हे केवळ राजकीय पोकळी निर्माण करणारे नाही, तर सर्वांसाठी एक मोठी वैयक्तिक हानी आहे.

अजित पवार हे कठोर निर्णय घेणारे अर्थमंत्री होते, परंतु लाडकी बहीण योजनेसारख्या जनहितकारी निर्णयांसाठी ते वित्त विभागाच्या आक्षेपांनाही जुमानले नाहीत. या योजनेनंतर त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घालण्यास सुरुवात केली होती आणि इतरांनाही ते घालण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. फडणवीसांनी अजित पवारांना एक सच्चा मित्र आणि सहप्रवासी म्हणून संबोधत, त्यांच्या अचानक निधनाने मनाला प्रचंड वेदना झाल्याचे सांगितले.