‘बिग बॉस 19’चा सीझन सध्या रंगात आला आहे. यंदा हिंदी बिग बॉसच्या घरात मराठमोळा महाराष्ट्रीयन भाऊ प्रणित मोरे स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. सध्या सोशल मीडियावर प्रणित मोरेच्या समर्थनात अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, मराठी प्रेक्षक आणि एक्स बिग बॉस कन्टेस्टंट्स सरसावले आहेत. बिग बॉसच्या अलिकडच्याच भागात प्रणित मोरे आणि अमाल मलिक यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला. खरं तर भांडण होतं प्रणित आणि अमालचं, पण या दोघांच्या वादात उडी घेतली बसीर अलीनं. त्यानंतर वादाला वेगळं वळण मिळालं आणि बसीर आणि प्रणित याच्यांत जोरदार भांडण झालं. अशातच आता दोघांचे फॉलोअर्स आपापसांत भिडले आहेत. तर, प्रणितच्या सपोर्टसाठी बिग बॉस मराठीचे स्पर्धक सरसावले आहेत. सर्वात आधी डीपी दादानं प्रणितसाठी व्हिडीओ केला. अशातच आता सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिनं एक व्हिडीओ शेअर करत प्रणित मोरेची बाजू घेतली आहे.
अंकितानं बिग बॉसमधल्या बसीर आणि प्रणितच्या भांडणाची एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये दोघांमधील भांडण विकोपाला जातं आणि बसीर रागात प्रणितला म्हणतो की, “गो बॅक टू युअर व्हिलेज…” बसीरच्या याच वाक्याचा समाचार अंकितानं तिच्या व्हिडीओमध्ये घेतला आहे. अंकिता म्हणते की, “हा म्हणतोय गो बॅक टू युअर व्हिलेज, जसा हा मोठ्या शहरातून आला आहे. आलोय आम्ही गावातून… आमच्या गावातील लोक प्रणितला इतके वोट करतील ना आणि त्या वोट्ससह तुला कपडेही पाठवून देतील…”
अंकिता पुढे म्हणाली की, “हीच ती वेळ आहे, अख्ख्या महाराष्ट्राने वोट करा… सगळ्या मराठी लोकांनी, गावातल्या गाववाल्यांनी… आता तर आम्हाला बघायचंच आहे की, गावी कोण परत जातंय ते… प्रणितला आता आतच ठेवायचं, तो बाहेर येताच कामा नये…”
अंकितानं आणखी एक क्लिप शेअर करुन म्हटलंय की, “बिग बॉसच्या घरात आतमध्ये गेल्यानंतर काय वाटतं, हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असेल. प्रणितचीही अवस्था तशीच झालीये. आपण असे नाही आहोत की, उगीच जाऊन किडे करा, मुद्दे बनवा आणि त्यावर भांडून दाखवा. आपल्या भावाला सपोर्ट करा, भरपूर वोट्स करा…” त्यानंतर अंकिता कुणालाही विचारते की, कुणाला वोट करायचंय? तर तो लगेच उत्तर देतो, “कुणाला काय? प्रणितला वोट करायचंय…”















