kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“इथे ड्रामा नव्हे डिलीव्हरी हवी”, संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. यावेळी ते विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत म्हणाले, “संसदेत ड्रामा नव्हे डिलीव्हरी व्हायला पाहिजे.” संसदेचं हे अधिवेशन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “संसदेचं हिवाळी अधिवेशन ही केवळ एक परंपरा नाही. हे अधिवेशन भारताला विकासाच्या मार्गावर नेण्याच्या प्रयत्नांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम करेल. नुकतीच बिहार विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विक्रमी मतदान झालं. लोकांनी मतदानातून लोकशाहीची सर्वात मोठी ताकद दाखवून दिली. विरोधी पक्ष मात्र बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहून चिंतेत आहेत. त्यांनी आता पराभवाच्या निराशेतून बाहेर यावं.

“भारत लोकशाही जगत आला आहे, भारत म्हणजेच लोकशाही आहे आणि ही गोष्ट वारंवार सिद्ध होत आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली.”

पंतप्रधानांनी यावेळी विरोधकांना सल्ला दिला की राजकारणात नकारात्मकता उपयोगी पडू शकते. मात्र, शेवटी राष्ट्रनिर्मितीसाठी सकारात्मक विचारसरणी असणं देखील आवश्यक आहे. मला तुमच्याकडून आशा आहे की तुम्ही नकारात्मकतेला मर्यादित ठेवाल आणि राष्ट्रनिर्मितीवर अधिक लक्ष केंद्रित कराल.

नव्या सभापतींना शुभेच्छा

“संसदेचं हे हिवाळी अधिवेशन आणखी एका गोष्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपले नवे सभापती आज पहिल्यांदा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना यानिमित्ताने शुभेच्छा देतो.”

जीएसटीसंबंधी नव्या निर्णयांचे संकेत

“जीएसटीमध्ये आपण अलीकडेच सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे देशात आल्हाददायक वातावरण आहे. या अधिवेशनातही जीएसटीच्या अनुषंगाने जनतेसाठी काही नवे निर्णय घेतले जातील.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मागील काही काळात आपल्या संसदेचा गैरवापर झाला आहे. काही लोकांनी निवडणुकीच्या तयारीसाठी तर काहींनी निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी संसदेचा वापर केला आहे. आम्ही पाहात आहोत की काही राज्यांमध्ये जिथे काही पक्ष व नेते सत्तेत आले, मात्र सत्ता मिळाल्यानंतरही त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यापैकी काहीजण जनतेचा सामना करण्यात असमर्थ ठरतायत. तेच लोक जनतेला सांभाळण्याऐवजी इथे संसदेत येऊन सगळा राग व्यक्त करत आहेत. काही खासदारांनी त्यांच्या राज्यांमधील अंतर्गत संघर्ष व राजकारण संसदेत आणून संसदेला त्यांच्या भांडणाचं व्यासपीठ बनवलंय. ही एक अस्वस्थ परंपरा रुजवली जातेय जी देशासाठी योग्य नाही.”