रिपाई (आठवले गट) अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे. मनसेला महायुतीत घेण्याची गरज नसल्याचं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केलं. रामदास आठवलेंनी आपल्या खास शैलीत राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरेंवरही टीका केली. त्याचबरोबर ईव्हीएमच्या मुद्यावरूनही विरोधकांनाही खडे बोल सुनावले. रामदास आठवले म्हणाले की, विधानसभेला आम्हाला १० ते १२ जागा द्या, अशी आमची मागणी होती. मात्र इतक्य जागा मिळणं अशक्य वाटल्याने आम्ही केवळ ४ ते ५ जागा मागितल्या व म्हटले की, आम्ही महायुती सोडणार नाही. आता लोकसभेच्या निवडणुकीवेळी महादेव जानकर हे शरद पवारांना भेटून आले आणि लगेच त्यांना महायुतीत परभणीची जागा सोडली. मग मी शरद पवारांना भेटलो असतो तर मलाही शिर्डीची जागा महायुतीत मिळाली असती. पण मी तसं केलं नाही.
महायुतीत राज ठाकरे यांच्या सहभागाबद्दल बोलताना रामदास आठवले यांनी म्हटलं की,राज ठाकरेंची हवा विधानसभा निवडणुकीत गेली आहे. राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत माझ्याशिवाय सरकार येणार नाही अशा स्वप्नात होते. पण त्यांचं स्वप्न भंग झालं आहे. राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात. पण लोक फक्त त्यांच्या सभा ऐकायला येतात आणि निघून जातात, त्यांना मतदान करत नाहीत. राज ठाकरे महायुतीत येतील असं वाटत नाही. पुढे काय निर्णय होणार? हे मला माहिती नाही. पण महायुतीत त्यांना घेण्यास फायदा नाही. मी महायुतीत असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?, असं रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी केलेल्या टीकेला मनसे नेते प्रकाश महाजनयांनी उत्तर दिले आहे. रामदास आठवलेंनी असं विधान करण्यापूर्वीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे विचारणा करावी. आमचे हिंदुत्वाचे विचार सारखेच असल्याने आम्ही राज ठाकरेंना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबत घेण्याबाबत विचार करू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. रामदास आठवलेजी तुम्हाला गोपिनाथ मुंडे यांनी भाजपाच्या झाडाखाली आणलं. तुम्ही त्या झाडावर चढलात आणि आता तुम्ही त्या झाडाचं एक बांडगुळ आहात. तुमच्यामुळे भाजपाला काहीही फायदा नाही. मात्र भाजपामुळे तुम्ही अखंड मंत्रिपदावर आहात, हे लक्षात घ्या,असंप्रकाश महाजन म्हणाले.