kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘पेट्रोल-डिझेल कमी वापरा, सोने खरेदी टाळा’, पंतप्रधान मोदींनी नागरिकांना असे आवाहन का केले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील एका सभेत बोलताना नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी काही पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणाचा दौरा केला. त्यावेळी सिकंदराबादमधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी नागरिकांना आवाहन केलं. यासाठी काय करायला हवं याचे काही मार्गही मोदी यांनी नागरिकांना सांगितले. पेट्रोल डिझेलचा संयमानं वापर करावा, वर्क फ्रॉम होम, यासह वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आणि स्वयंपाकाचे तेल कमी वापरण्याचे आवाहनही मोदींनी केले.

काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान मोदी जनतेला आवाहन करत असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “पुरवठा साखळीच्या संकटाच्या काळात गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शेजारी एक मोठं युद्ध सुरू आहे. याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला असून भारताला तर अधिकच गंभीर फटका बसला आहे.”

“भारताकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत. आपल्याला आवश्यक असलेलं पेट्रोल, डिझेल आणि गॅस हे सर्व इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात आयात करावं लागतं. युद्धामुळं जगभरात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. त्या गगनाला भिडल्या आहेत. शेजारील देशांमध्ये काय घडत आहे, हे वर्तमानपत्रांमध्ये येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारत सरकार देशवासियांना या संकटातून वाचवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहे. नागरिकांवर भार पडू नये, यासाठी सरकार संपूर्ण भार स्वतःच्या खांद्यावर घेत आहे,” असंही मोदी म्हणाले.

युद्धामुळं संपूर्ण जगात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांचे दर आकाशाला भिडले आहेत. पुरवठा साखळीवरचं संकट कमी होत नसेल तर कितीही उपाय केले तरी समस्या वाढतात. त्यामुळं देशाला सर्वोच्च मानत आपल्याला एक होऊन लढावं लागेल. देशासाठी मरणंच देशभक्ती नसते. देशासाठी जगणं आणि देशासाठी कर्तव्य पार पाडणं ही देखील देशभक्ती असते, असं पंतप्रधान म्हणाले. आपल्याला पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा लागेल. शहरांमध्ये मेट्रो असेल तिथं मेट्रोचाच वापर करू असं ठरवावं. कारमध्ये जाणं गरजेचंच असेल तर कारपुल सारख्या पद्धती अवलंबाव्या. कारमध्ये आपल्याबरोबर इतरांनाही घेऊन जा. कुठे सामान पाठवायचं असेल तर ते रेल्वेच्या माध्यमातून पाठवण्याचा प्रयत्न करावा. इलेक्ट्रिक वाहनं असतील तर त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा,” असे पर्यात नरेंद्र मोदींनी सुचवले.

कोरोनाच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मिटींग असे अनेक पर्याय तयार केले. त्याची आपल्याला सवयही झाली. आज त्यांचा वापर करणं ही काळाजी गरज बनली आहे. त्यानं देशाला फायदा होईल, असं मोदींनी म्हटलं. “खाद्यतेलाच्या बाबतीतही हेच आहे. त्याच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावं लागतं. प्रत्येक जेवणात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण कमी करणे हेदेखील एक देशभक्तीचे कृत्य आहे. यामुळं देशाती आणि शरीराची सेवा होईल. यामुळे देशाच्या तिजोरीचे आणि कुटुंबीयांच्या आरोग्यात सुधारणा होईल,” असंही पंतप्रधान म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *