kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

राहुल गांधी यांच्यामुळे देशाची सुरक्षा धोक्यात ; केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिज्जू यांचा आरोप

काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारतविरोधी शक्तींशी जोडलेले आहेत. ते परदेशात आणि देशात नक्षलवादी, दहशतवादी आणि जॉर्ज सोरोससारख्या लोकांना भेटतात. भारताच्या सुरक्षेसाठी ते आता सर्वांत धोकादायक व्यक्ती बनले आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिज्जू यांनी केला आहे.

रिजिज्जू म्हणाले, राहुल गांधी जेव्हा-जेव्हा परदेशात जातात, तेव्हा ते भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतात. परदेशी भूमीवर ते भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हे देशाच्या हिताचे नाही. ज्या परदेशी नेत्यांची भूमिका भारताच्या अखंडतेच्या विरोधात आहे, त्यांना राहुल गांधी भेटतात.

काँग्रेसचे काम फक्त संसदेत गोंधळ घालणे आहे. आम्ही त्यांना बोलू देत नाही. पण जसे राहुल गांधी आत येतात, गोंधळ, फलक आणि घोषणाबाजी सुरू होते. समाजवादी पक्षही असेच करतो; पण त्यांच्याशी बोलता येते. आम्ही समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि अगदी डीएमकेच्या नेत्यांसोबतही चांगले काम करू शकतो. राहुल गांधींच्या वागणुकीमुळे छोट्या विरोधी पक्षांना आणि खासदारांना बोलण्यासाठी वेळ मिळत नाही. ते त्यांच्या भागातील प्रश्‍न मांडू शकत नाहीत.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर रिजिज्जू म्हणाले की, अध्यक्षांचे काम कामकाज चालवणे, सरकारी काम पुढे नेणे आणि विरोधी खासदारांना बोलण्याची संधी देणे हे आहे. ज्या पद्धतीने विरोधी खासदार अध्यक्षांच्या दालनात घुसले आणि निदर्शने केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संयम आणि नम्रता दाखवली. जर सोमनाथ चटर्जी अध्यक्ष असते, तर कदाचित त्यांनी सर्वांना निलंबित केले असते.

विरोधकांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस सादर केली. यावर 118 खासदारांच्या सह्या आहेत. ओम बिर्ला आता लोकसभेत जाणार नाहीत. अविश्‍वास प्रस्ताव फेटाळल्यानंतरच ते अध्यक्षपदाची खुर्ची सांभाळतील. विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर सभागृहात 9 मार्च रोजी चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण 13 फेब्रुवारी रोजी अंदाजपत्रकीय अधिवेशनाच्या सध्याच्या सत्राचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर 8 मार्चपासून सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होईल.