kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

भोंदू अशोक खरातसोबत फोटो आहेत म्हणजे दोषी नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे राज्यातील अनेक बड्या नेत्यांसोबतचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्यानंतर या नेत्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, असे केवळ कोणासोबत फोटो, व्हिडीओ आहेत म्हणून दोषी ठरत नाही अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर शुक्रवारी मांडली. आणखी धक्कादायक माहिती अशोक खरात प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ते म्हणाले की, या प्रकरणात आम्ही अतिशय खोलवर जाऊन तपास करत आहोत. अनेक गोष्टी समोर येत आहेत. आणखी काही एफआयआर होण्याची शक्यता आहे. काही महिलादेखील समोर येत आहेत. खरातने आर्थिक फसवणूक केली म्हणूनही काही जण पुढे येत आहेत, त्याबाबतही गुन्हे दाखल केलेच जातील.

अशोक खरातशी संबंधित काही व्हिडीओ सोशल मीडियावर काही जण टाकत असून त्याद्वारे संबंधित महिलांची बदनामी होत आहे. आम्ही असे व्हिडीओ हटवत आहोत पण ते व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. दुर्दैवाने या प्रकरणात बळी पडलेल्या महिलांचे व्हिडीओ अपलोड करणे, व्हायरल करणे, फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे, त्यांच्यावर आणि त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया टाकत आहेत अशांवरही फौजदारी कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

भोंदू अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्याची एचआयव्ही तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. खरातच्या कार्यालयात शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही एसआयटी पथकाने तपासणी करून काही कागदपत्रे व वस्तू जप्त केल्या.