नाशिक इथं उघडकीस आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे राजकीय नेत्यांशी संबंध चर्चेत आले आहेत. राज्यातील काही आमदार आणि मंत्री यांचे खरातबरोबरचे फोटो समोर आले आहेत. असे असताना भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शिवसेना नेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या अशोक खरातच्या भक्त असल्याचा दावा केला.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई म्हणाल्या, “39हून अधिक आमदार यांचे फोटो अशोक खरात यांच्यासोबतचे समोर आले आहेत. असे असताना राज्यातील विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यादेखील गेल्या सात ते आठ वर्षांपासून अशोक खरात यांना मंत्रिपदासाठी भेटत आहेत. नाशिक येथील कॉलेज रोड जिथ महिलांवर अत्याचार झाले. तिथं तसेच नाशिक येथील एका हॉटेलवर गोऱ्हे हे अशोक खरातला भेटले आहेत. त्या भविष्य जाणून घेत होत्या. मात्र, आत्तापर्यंत नीलम गोऱ्हे यांनी याबाबत काहीच सांगितलं नाही. त्या संवैधानिक पदावर असताना त्यांनी याबाबत आवाज उठविला पाहिजे होता. राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे”.
त्या पुढे म्हणाल्या की,” निलम गोरे यांनी पूजा केली की याबाबत माहिती नाही. पण, ज्या पद्धतीनं अशोक खरात यांचे पूजा करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. ते पाहता गोऱ्हे यांनी पूजा केली असेल. तसेच या प्रकरणात त्यांनी एकदाही सभागृहात आवाज उठवला नाही. कारण, त्या अशोक खरात यांच्या भक्त होत्या. यामुळे या प्रकरणात त्यांची चौकशी व्हावी”, अशी मागणी असल्याचं यावेळी तृप्ती देसाई यांनी सांगितलं.
आणखी काय म्हणाल्या तृप्ती देसाई ?
नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरात प्रकरणात आवाज का उठविला नाही, असा देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी म्हटलं,”नाशिकरोडमधील ऑफीसमध्ये लैंगिक शोषणाचे व्हिडिओ बाहेर आले आहेत. अनेक राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार हे खरातच्या कार्यालयात जात असल्याचं आणि भविष्य पाहत असल्याची चर्चा आहे. काही जणांचे फोटो नाहीत, पण ते भेटले आहेत. त्यामध्ये नीलम गोऱ्हे आहेत. त्या खरातच्या भक्त आहेत. कोरोनाच्या काळाच्या आधी नीलम गोऱ्हे यांनी त्याची भविष्य जाणून घेण्यासाठी भेट घेतली. लैंगिक शोषणाचे दीडशे पीडित असताना त्यांनी जबाबदार पद आणि महिला नेता असूनही सभागृहात बोलल्या नाहीत. अशोक खरात त्यांचा परिचयाचा असला तरी त्यांनी आवाज उठवायला होता. तुम्ही शांत बसलात, ही तुमच्याकडं अपेक्षा नव्हती”.
“तुम्ही अशोक खरातला का भेटला, याची उत्तरे द्यायला हवी. एसआयटीनं त्यांचा सीडीआर तपासणं गरजेचं आहे. त्या अंधश्रद्धेबाबत आवाज उठवितात. त्यांना माहिती असूनही त्यांनी आवाज का उठविला नाही? ते सत्ताधारी असूनही त्यांनी आमदारांना आवाज उठवायला सांगायला होतं. रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ आणि फोटो बाहेर आले आहेत. चाकणकरांची चौकशी होणार आहे. नीलम गोऱ्हेंची चौकशी का होऊ नये,”, असे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.
नीलम गोऱ्हेंनी फेटाळले आरोप
नीलम गोऱ्हे यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं,” मी कोणत्याही भोंदू बाबाला भेटले नाही. खरातची भेट घेतल्याच्या बातम्या कल्पोकल्पित आहेत. भोंदूंना भेटण्याचे माझे संस्कार नाहीत. पुणे पालिकेत यश न मिळालेले असंतुष्ट घटक माझ्याविरोधात आहेत. माझ्या प्रोटोकॉलमधील कार्यक्रम पाहा. जसा कार्यक्रम आहे, तसाच फॉलो केला आहे. त्या हॉटेलमध्ये सहा वर्षे गेले नाही. आरोप करणाऱ्यांचा हेतू कळत नाही. कालांतरानं कळेल. नाशिकला 50 ते 60 वेळेला गेले असेन. भोंदूला कधीही भेटले नाही. आम्ही हयात असलेल्या महाराजांकडे कधीही गेले नाही”. अधिवेशन सुरू असताना अशोक खरात प्रकरणाचे प्रश्न उपस्थित केले असते तर हस्तक्षेप केला असे असे झाले असते, असेही त्यांनी सांगितलं.















