बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अत्यंत भावनिक भाषण करत मतदारांना साद घातली. दोन महिन्यांपूर्वी दादांचं निधन झालं असून, त्या दु:खातून बाहेर पडत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, भाजपाचे मंत्री चंद्रकांत बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “दादा गेलेत हे आजही मला मान्य नाही. बारामती हा त्यांचा श्वास होता आणि त्यांचा शेवटचा श्वासही बारामतीतच विसावला,” असं सांगताना त्या भावुक झाल्या. “माझं दुःख मी मनात दडपून ठेवलं आणि तुमच्याकडे बघून मला धीर आला,” असंही त्या म्हणाल्या.
बारामतीच्या प्रत्येक वास्तुला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्यांचे विक्रेम मोडून काढले आहेत. ही निवडणूक नाही, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन, असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी यावेळी दिलं. बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही निवडणूक ही माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर (थोडी अधिक) मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितले.
बारामतीचा विकास कायम सुरू राहील. प्रशासनावर दरारा राहील, बारामतीची ओळख तशीच राहील. गुंडागर्दी आणि खंडणीला थारा मिळणार नाही. आता विकास थांबणार नाही याची खात्री बाळगा, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. महायुतीचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे. अजितदादांचा विचाराचा वारसा सांभाळात मी काम करीत राहील. 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून म्हणून 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून मला राज्य सांभाळायाची ताकद मिळेल, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांचा विचार पुढे घेऊन जाते. जय पवार आणि पार्थ पवार हे माझं कुटुंब नाही. तुम्ही सगळे माझं कुटुंब आहात. एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही. अजितदादांचा जनता दरबार सुरू राहील. बारामतीचा विकास कायम सुरू राहील, अशी ग्वाही सुनेत्रा पवारांनी दिली.
बारामती विधानसभेसाठी काँग्रेसच्यावतीनं आकाश मोरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर करुणा मुंडे यांनी देखील बारामतीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा जरी सत्ताधारी पक्षाचा आग्रह असला आणि त्याला शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीनं पाठिंबा देण्यात आला असला तरी काँग्रेसनं ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्यावतीनं माजी आमदार विजयराव मोरे यांचे पुत्र आकाश मोरे हे या निवडणुकीत सहभागी झाले असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं आज तरी स्पष्ट होतय. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं.
















Leave a Reply