विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही का? की भाजपाकडून अतिरिक्त उमेदवार दिला जाणार, याबाबतचे सर्व तर्क-वितर्क अखेर आज संपुष्टात आले. शिवसेनेचा दहावा चेहरा किंवा मतांचा ‘घोडेबाजार’ या सर्व राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीकडून आठ आणि महाविकास आघाडीकडून एक असे एकूण नऊ उमेदवार रिंगणात उतरले. अतिरिक्त उमेदवारी न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भाजपनानं आपली पाच उमेदवारांची यादी दोन दिवसांपूर्वीच जाहीर करून आघाडी घेतली होती. मात्र, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली. अर्ज दाखल करण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असताना, दुपारी एकच्या सुमारास नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी नीलम गोऱ्हे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत घोषणा टाळतच हालचाली सुरू ठेवण्यात आल्या होत्या. अखेर झिशान सिद्दीकी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुनेत्रा पवारांसह पक्षाचे वरिष्ठ नेते विधानभवनात दाखल झाले. त्यानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट झालं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “प्रहार संघटना स्वतंत्र राहील, पण, शिवसेनेशी संलग्न राहून रस्त्यावरची ताकद आणि सत्तेची ताकद एकत्र येईल. बच्चू कडू यांचाही हा निर्णय केवळ उमेदवारीसाठी नसून विचारांच्या एकतेसाठी असल्यानं स्वागतार्ह आहे. नीलम गोऱ्हे यांच्या दीर्घ अनुभवाचा आणि विधानपरिषदेत महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचा आम्ही आदर करतो. त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.”
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते नाराज होते. त्यांची मनधरणी करण्यासाठी शिवसेना (उबाठा) नेते काँग्रेस कार्यालयात पोहोचले. त्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसचा विरोध मावळला. दुपारी अडीच वाजता अंबादास दानवे यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसह अर्ज दाखल केला.
कोण आहेत उमेदवार?
प्रमोद जठार- कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. 2009 मध्ये काँग्रेसचे उमेदवार रविंद्र फाटक यांचा अवघ्या 32 मतांनी पराभव करत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. 2014 मध्ये नीतेश राणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक कामकाजात सक्रिय भूमिका बजावली. त्यांच्या निवडीमुळे कोकणाला पुन्हा प्रतिनिधित्व मिळणार आहे.
माधवी नाईक- भाजपाच्या सरचिटणीस माधवी नाईक यांचे नाव यापूर्वीच निश्चित झालं होतं. ठाणे येथील नाईक या पक्षाच्या राज्यस्तरीय तसेच स्थानिक संघटनांमध्ये सक्रिय आहेत. विविध आंदोलनांत सहभाग आणि पक्षधोरणांचा आक्रमक प्रचार ही त्यांची ओळख आहे.
विवेक कोल्हे- अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या कोल्हे घराण्यातील युवा नेते विवेक कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा असतानाही पक्षनिर्णय मान्य करत त्यांनी माघार घेतली होती. त्याच निष्ठेची दखल घेत त्यांना आता संधी देण्यात आल्याचं मानलं जातं आहे.
सुनील कर्जतकर-भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांना संघटनात्मक योगदानाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षात दीर्घकाळ सक्रिय राहून त्यांनी संघटन बळकट करण्याचं काम केलं आहे.
संजय भेंडे- प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पार्श्वभूमीचे नेते आहेत. संघटनशिस्त आणि निवडणूक व्यवस्थापनातील अनुभवासाठी ओळखले जातात. ओबीसी चेहरा म्हणूनही त्यांना पुढे करण्यात आल्याची चर्चा आहे.
प्रज्ञा सातव- काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली होती. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.
झिशान सिद्दीकी- माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2019 मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातून ते विजयी झाले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी पक्षानं त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.
बच्चू कडू- प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. आक्रमक आंदोलनशैली, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी लढा ही त्यांची ओळख आहे. अलीकडील राजकीय घडामोडीनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
नीलम गोऱ्हे- शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. विधानपरिषदेतील दीर्घ अनुभव, उपसभापती पदाचा कार्यकाळ आणि विविध समित्यांमधील नेतृत्वामुळे त्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात.













Leave a Reply