kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुणे जिल्हा काँग्रेसचा आधारस्तंभ निखळला; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं निधन

पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने पुणे जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते. माजी आमदार आणि भाजपचे नेते संग्राम थोपटे यांचे ते वडिल होते.

अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे सध्या राज्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. संग्राम थोपटे यांचा 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते शंकर मांडेकर यांनी पराभूत केले होते. त्यांनतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अनंतराव थोपटे यांनी पुण्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी त्या काळात खूप प्रयत्न केले. काँग्रेस पक्षवाढीत त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. म्हणूनच त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनंतराव थोपटे यांना 1983 साली पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्या काळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी अनंतराव थोपटे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना राज्यमंत्रिपद दिलं. दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *