फिलीपिन्समध्ये सोमवारी शक्तिशाली भूकंप झाला. दक्षिण फिलीपिन्सच्या मिंडानाओ प्रदेशात 7.8 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाची तीव्रता सुरुवातीला रिश्टर स्केलवर 7.7 आणि नंतर 7.8 इतकी नोंदवली गेली. भूकंपामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे. तसंच भूकंपामुळं मालमत्तेचं आणि जीवितहानीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 129 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, स्थानिक नागरी संरक्षण कार्यालयाचे संचालक रॉड्रिगो सोस्मेना यांनी सांगितलं की, 12 जणांचा मृत्यू सॉक्सक्सार्गेनमध्ये झाला. हा परिसर दक्षिण कोटाबाटो, सुलतान कुदरत, सारंगानी आणि जनरल सँटोस सिटी या चार प्रांत आणि एका शहरात पसरलेला परिसर आहे. सरकारनं बाधितांसाठी मदत सामग्रीचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. क्विक रिस्पॉन्स टीम्स देखील सज्ज असून, संभाव्य संसाधने एकत्रित करण्यासाठी सतत देखरेख आणि समन्वय साधत आहेत. बेटाच्या काही भागांसाठी स्थलांतराचे आदेशही जारी करण्यात आले असून, रहिवाशांना उंच ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याचबरोबर, जपान, फिलीपिन्स आणि इंडोनेशियामधील अधिकाऱ्यांनी धोकादायक लाटांचा इशारा देत किनारपट्टीवरील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचा सल्ला दिला आहे. काल रात्रीच्या सुरुवातीला भूतानमध्ये रिश्टर स्केलवर 5.8 तीव्रतेचा भूकंप झाला.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, सोमवारी फिलीपिन्समध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टनुसार, भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5:07 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू 93 किलोमीटर खोलीवर होता. त्यानंतर लगेचच पहाटे 5:18 वाजता 6.4 तीव्रतेचा आणखी एक शक्तिशाली धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू 79 किलोमीटर खोलीवर होता.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, सोमवारी दक्षिण फिलीपिन्समधील मिंडानाओजवळ 7.7 तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. फिलीपिन्स आणि शेजारील इंडोनेशियामधील भूभौतिकीय संस्थांनी त्सुनामीचा इशारा दिला. दोन्ही देशांमध्ये मोठ्या नुकसानीचं कोणतंही तत्काळ वृत्त नाही. अमेरिकेच्या त्सुनामी इशारा प्रणालीनं भूकंपामुळं त्सुनामीचा इशारा दिला आहे. तसंच फिलिपिन्सच्या एका संस्थेनं एक मीटर (यार्ड) उंचीच्या त्सुनामी लाटांचा इशारा दिला आहे.














Leave a Reply