राज्यात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देहविक्री असा उल्लेख करीत भाजपला लक्ष्य केल्यानंतर याबाबत राज ठाकरे यांच्यावर हक्कभंग कारवाई होऊ शकते, असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते घाणेरडे आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाहीत तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेतच, अशी वादग्रस्त टीका राज ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी हा इशारा दिला.
राज ठाकरे यांचे विधान आहे, त्यात हक्कभंग होऊ शकतो, त्यांचे विधान विशेषाधिकाराचे हनन करणारे आहे. मनात त्यांच्याबद्दल आदर आहे, मी हक्कभंग टाकणार नाही, मात्र विधान तसे आहे, असे कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा छळ केला म्हणून त्यांनी पक्ष सोडला, असे कदम म्हणाले.
लोकांना रोष वाटला असता तर पक्षांतर करणारे हरले असते. २०-२० लाख लोकांमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी पक्ष बदलतात याचे काही कारण असेल की नसेल, एखादा कॅबिनेट मंत्री सत्ता सोडून गेला असे कुठे झाले आहे का कधी, एकनाथ शिंदेंसोबत गेले होते ते परत निवडून आले आहेत ना. लोकांना रोष वाटला असता तर ते हरले असते, असेही कदम यांनी नमूद केले.
महाराष्ट्रासह देशात सध्या सुरू असलेले पक्षफोडीचे राजकारण अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा आहे. सत्ता कायमस्वरूपी कोणाकडेच राहत नाही, त्यामुळे सध्या निर्माण होत असलेली राजकीय पद्धत भविष्यात सत्ताधाऱ्यांना महागात पडू शकते’, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली.











Leave a Reply