मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या दमदार व कसदार अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिरात पार पडलेल्या या शानदार सोहळ्यात महाराष्ट्राचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते मोहन जोशी यांना सहपत्नीक सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री उदय सामंत तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील एकत्र एका व्यासपीठावर आल्यामुळं राजकीय टोलेबाजीसह मैत्रीपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम रंगला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने दरवर्षी कलाक्षेत्रातील उत्तुंग योगदानाबद्दल हा सन्मान दिला जातो. रोख रक्कम 51 हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा मानाचा पुरस्कार पहिल्यांदा ज्येष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया आणि दुसऱ्यांदा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला होता; तर आता तिसऱ्यांदा हा सन्मान मोहन जोशी यांना मिळाल्याने या पुरस्काराची परंपरा अधिक समृद्ध झाली आहे. पुरस्कार स्वीकारताना, “अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत माझा गौरव होणे, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. त्यातही मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते माझा सन्मान होत आहे,” अशी भावना मोहन जोशी यांनी व्यक्त केली. या सोहळ्यास नाट्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, मुख्य कार्यवाह गिरीश महाजन, आमदार सतेज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सुप्रसिद्ध निवेदक व मुलाखतकार राजेश दामले यांनी मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी मोहन जोशी यांच्या सुरुवातीच्या संघर्षापासून ते रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील संस्मरणीय भूमिकांचा पट उलगडला गेला. नाटकाच्या दौऱ्यांमधील आठवणी, हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील अनुभव आणि यशाच्या शिखरावर पोहोचताना पत्नी ज्योतीताईंनी दिलेली खंबीर साथ यावर जोशी दांपत्यानं मनमोकळा संवाद साधला. या मुलाखतीनं उपस्थित कोल्हापूरकर नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध केलं. तसंच कार्यक्रमादरम्यान आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या या सांस्कृतिक ठेव्याचं जतन करण्यासाठी नाट्य परिषदेच्या स्थानिक शाखेला स्व. डी. वाय. पाटील यांच्या नावे 10 लाख रुपयांची मुदत ठेव देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
या सांस्कृतिक व्यासपीठावर राजकीय पक्षांच्या सीमा बाजूला ठेवून नेत्यांमधील दिलखुलास मैत्री आणि राजकीय फटकेबाजीचा रंग पाहायला मिळाला. व्यासपीठावर उपस्थित उद्योगमंत्री उदय सामंत आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी एकमेकांना लगावलेल्या मिश्कील टोल्यांमुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. आगामी गोकुळ दूध संघाच्या राजकारणाचा संदर्भ देत सतेज पाटील यांनी ‘आम्हाला आता गोकुळच्या प्रयोगाची गडबड आहे’ असा टोला लगावला, तर त्याला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, “कोल्हापुरात निवडणुकीच्या काळात मोठी पळापळी असते. गोकुळच्या निवडणुकीवर तर एक सुपरहिट चित्रपटच बनू शकतो.” उदय सामंत यांनी सतेज पाटील यांच्यासोबतच्या 25 वर्षांच्या जुन्या मैत्रीचा आणि संकटाच्या काळात मिळालेल्या सहकार्याचा पुनरुच्चार करत, “पक्ष आणि पक्षीय राजकारण वेगळे असले तरी कोल्हापूरच्या नेत्यांमध्ये संकटात एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची खिलाडूवृत्ती आहे,” असं सांगत राजकीय मतभेदांपेक्षा मैत्रिपूर्ण संबंध मोठे असल्याचं स्पष्ट केलं.












