छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदेंनी हातात शिवबंधन बांधलं. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदेंनी ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसह तब्बल 18 जणांनी भाजपला रामराम करत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्नही पाहायला मिळाले. मात्र राजू शिंदेंनी आता या गोष्टीला उशीर झालाय असे वरिष्ठांना सांगितले होते.

“भाजपमध्ये मंडळ अध्यक्ष हा सर्वात मोठा असतो. माझ्यासोबत पाच मंडळ अध्यक्ष आहेत. त्यासोबतच तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि पश्चिम विधानसभेची भाजपची कोअर टीम ही माझ्यासोबत आहेत. हे सर्व माझ्यासोबत यायला तयार आहेत. त्यांच्यामुळेच मी हे निर्णय घ्यायला तयार झालो”, असे राजू शिंदे म्हणाले.