राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढला आहे. उद्या मंगळवारी (दि १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात येणार आहे. पुण्यामधील टिळक रस्त्यावरील एस.पी. महविद्यालयाच्या मैदानवर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनिमित्त वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. काही रस्ते बंद करण्यात आले आहेत तर काही ठिकाणची वाहतुकी ही वळवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगळवारी पुणे दौरा आहे. त्यांची जाहीर सभा टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आहे आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. या मार्गावरची वाहतूक ही वळवण्यात आली आहे. ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे वाहनचालकांना जावे लागणार आहे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे.
तर बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जॉगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. येथून पुढे इच्छितस्थळी जावे. तर साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते निलायम चित्रपटगृह) येथे कोणतेही वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोमवारी मध्यरात्री १२ नंतर शहरात जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. सोलापूर रस्ता (भैरोबा नाला चौकाच्या पुढे), नगर रस्ता (खराडी बाह्यवळण चौकाच्या पुढे), आळंदी रस्ता (बोपखेल फाटा चौकाच्या पुढे), जुना मुंबई-पुणे रस्ता (हॅरीस पुलाच्या पुढे), ओैंध रस्ता (राजीव गांधी पुलाच्या पुढे), बाणेर रस्ता (राधा हाॅटेल चौकच्या पुढे), पाषाण रस्ता (छत्रपती शिवाजी चौकाच्या पुढे), पौड रस्ता (पौडा फाटा चौकाच्या पुढे), कर्वे रस्ता (वारजे उड्डाणपुलाच्या चौकाच्या पुढे), सिंहगड रस्ता (वडगाव उड्डाणपुलाच्या पुढे), सातारा रस्ता (मार्केट यार्ड चौकाच्या पुढे), सासवड रस्ता (बोपदेव घाटमार्गे) कोंढव्यातील खडी मशीन चौकाच्या पुढे, हडपसर ते सासवड रस्ता (मंतरवाडी फाटा ते हडपसरकडे ), लोहगाव रस्ता (पेट्रोल साठा चौकाच्या पुढे) या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.