kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू ; धर्म विचारून २७ जणांची हत्या

दक्षिण काश्मिरातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला असून यावेळी दहशतवाद्यांनी महिला आणि वृद्धांसह अनेकांना लक्ष्य केले. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पहलगाम पर्यटन भागातील बैसरन व्हॅलीमधील डोंगरावरून दहशतवादी खाली आले आणि त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांची नावे विचारून गोळ्या घातल्या. या हल्ल्यात दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचेही समजत आहे.

या हल्यादरम्यानचे काही व्हिडिओदेखील समोर आले आहेत. यात, ठीक-ठिकाणी जखमी लोक रडताना आणि आक्रोश करताना दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये, एक पीडित महिला रडत रडत सांगत आहे की, “आम्ही भेळपुरी खात होतो, तेव्हा बाजूने दोन लोक आले आणि त्यापैकी एक जण म्हणाला, हा मुस्लीम दिसत नाही, घाला गोळी आणि त्यांनी माझ्या पतीला गोळी घातली.”

समोर आलेल्या माहितीनुसार, गोळी झाडण्यापूर्वी, कोण कोणत्या धर्माचे आहे, हे लक्षात यावे, यासाठी दहशतवाद्यांनी लोकांना ‘कलमा’ पढायला सांगितला. याशिवाय, दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची पँट काढायला सांगितली आणि त्यांचे ओळखपत्रही तपासले.

या वर्षी पर्यटकांवर झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात अतिरेक्यांनी पर्यटकांवर शेवटचा हल्ला केला होता, ज्यामध्ये दोन पर्यटक जखमी झाले होते. ती घटना देखील पहलगाममध्ये घडली होती.