kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जागतिक विमान वाहतूक व्यवस्थेत भारत एक आघाडीची शक्ती म्हणून उदयास येत आहे. जगातील आघाडीच्या विमान कंपन्यांसाठी भारतात गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट संधी आहे. भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच उडान योजनेचे यश हे भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सुवर्ण अध्याय आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (आयएटीए) ८१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला आणि जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेच्या सत्राला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. १ ते ३ जून दरम्यान हा कार्यक्रम आयोजित केला असून ४२ वर्षांनंतर आयएटीएची वार्षिक सर्वसाधारण सभा भारतात होत आहे. यापुर्वी १९८३ मध्ये ही सभा भारतात झाली होती.

यंदा दिल्लीत आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधानांसह केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राम मोहन नायडू, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आयएटीए प्रशासन मंडळाचे अध्यक्ष पीटर एल्बर्स, आयएटीएचे महासंचालक विली वॉल्श, इंडिगोचे व्यवस्थापकीय संचालक राहुल भाटिया उपस्थित होते. तसेच जागतिक विमान वाहतूक उद्योगातील प्रमुख मान्यवर, अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय माध्यम प्रतिनिधींसह १६०० हून अधिक लोक सहभागी झाले आहेत.

या कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत करत पंतप्रधान म्हणाले की, गेल्या दशकात नागरी विमान वाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती झाली आहे. ही शिखर परिषद आणि संवाद केवळ विमान वाहतूक क्षेत्रासाठीच नव्हे तर जागतिक सहकार्य आणि न्याय्य वाढीसाठी एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे. या शिखर परिषदेतील चर्चा जागतिक विमान वाहतूक क्षेत्राला नवीन दिशा देईल, २१ व्या शतकातील आकांक्षा पारंपारिक प्रवासाच्या पलीकडे विकसित होत राहिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, प्रवास आता पृथ्वीवरील शहरांपुरता मर्यादित राहीला नाही तर अंतराळ उड्डाणे आणि आंतरग्रहीय प्रवासांचे व्यावसायिकीकरण करण्याच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा आहेत. अशा गोष्टींना वेळ लागेल मात्र या गोष्टी परिवर्तन आणि नवोपक्रमाचे केंद्र म्हणून भविष्य अधोरेखित करतात आणि यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. विविध ताकदींसह भारत आपल्या विमान वाहतूक क्षेत्राला अभूतपूर्व उंचीवर नेण्यास सज्ज आहे. उडान योजनेतर्गत १५ दशलक्षाहून अधिक प्रवाशांना परवडणाऱ्या हवाई प्रवासाचा फायदा झाला आहे, ज्यामुळे अनेक नागरिकांना पहिल्यांदाच विमान प्रवास करता आला आहे. भारतात दरवर्षी ३.५ दशलक्ष मेट्रिक टन मालाची वाहतूक हवाई मार्गाने केली जाते आणि या दशकाच्या अखेरीस हे प्रमाण १ कोटी मेट्रिक टनांपर्यंत वाढणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.