आज उत्तर मध्य मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने, मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी भव्य व शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला.
या विभागात सुमारे ९ ते ११ लाख नागरिक राहतात, परंतु आजही त्यांच्या जीवनात गटारसफाई, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण व सुरक्षित रस्ते या मुलभूत सेवा अपुऱ्या आहेत. अनेक भागांत नागरिकांना सांडपाणी साचलेल्या रस्त्यावरून चालावं लागतं, पिण्याच्या पाण्यासाठी लांबवर जावं लागतं, तर दुसरीकडे शासकीय दवाखान्यांमध्ये डॉक्टरच नाहीत. एल विभागातील प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे मांडण्यात आल्या गटार व्यवस्था अपुरी जुनी व चोक झालेली गटारे, उघड्यावर वाहणारे सांडपाणी, मलेरिया व डेंग्यूचा प्रकोप, पाणीपुरवठा अपुरा – झोपडपट्टी व वस्ती भागांत पुरेसे व नियमित पाणी मिळत नाही. स्वच्छतेचा अभाव उघड्यावर कचरा, सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था,आरोग्य केंद्रांची कमतरता – डॉक्टर, औषधे व मूलभूत आरोग्य सुविधा मिळत नाहीत. शिक्षणात ढासळती गुणवत्ता – पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक व सुविधा अपुऱ्या रस्ते व वाहतूक समस्या खड्ड्यांनी भरलेले रस्ते, वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका बेकायदेशीर बांधकामे व SRA धोरणातील अकार्यक्षमता मनोरंजन व खेळाच्या सुविधा नसणे तरुणांसाठी मैदानं, उद्याने, वाचनालय यांचा अभाव असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले यांनी म्हटले आहे.
प्रशासनाकडे ठेवल्या मागण्या एल विभागात तातडीने गटरसफाई, ड्रेनेज व्यवस्था सुधारावी जलटंचाई भागवण्यासाठी नळ जोडणी व टँकर सेवा सुनिश्चित करावी.आरोग्य केंद्रे सुसज्ज करावीत.प्रत्येक वस्तीमध्ये कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्था राबवावी. पालिकेच्या शाळांना डिजिटल शिक्षण व पोषण आहार योजनेत समाविष्ट करावे. रस्ते दुरुस्ती, वाहतूक नियंत्रण यंत्रणा बळकट करावी.SRA योजनेतील प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत.
युवकांसाठी मैदान, व्यायामशाळा, वाचनालय सुरू करावीत. अशा मागण्या यावेळेस करण्यात आल्या.
मोर्चानंतर एल विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. धनाजी हेर्लेकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात आले. प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करावी, अन्यथा एल विभागातील जनता आंदोलनाच्या उग्र टप्प्याकडे वळेल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी मोर्चात मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव,जिल्हाध्यक्ष व माजी आमदार मिलिंद (अण्णा) कांबळे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष सिराजभाई अहमद,युवक कार्याध्यक्ष अजय समगीर,सरचिटणीस चंद्रमणी जाधव, सचिव बाबू बतेली,कुर्ला तालुकाध्यक्ष मुन्नाभाई, अमित ढमाळ, इमरान तडवी,युवक सरचिटणीस नवनाथ निकम, युवक जिल्हाध्यक्ष किरण राणे,चांदिवली तालुकाध्यक्ष ॲड. कुतुब आलम शाह, कालिना तालुका अध्यक्ष सेलवेन देवेंद्र, वॉर्ड अध्यक्ष राजेंद्र ढवळे आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही जनता ‘फक्त आकडेवारीतील जनता’ नसून, ‘हक्कांची, सजग व सशक्त जनता’ आहे.
जर प्रशासन वेळेवर निर्णय घेत नसेल, तर हा मोर्चा ही सुरुवात मानावी एल विभागातील जनता आता शांतपणे नव्हे, तर ठामपणे लढेल.
जनतेसाठी, हक्कांसाठी, आणि मुंबईच्या समतोल विकासासाठी,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा लढा सुरूच राहील! असे ते म्हणाले.














