भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला उद्देशून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात आहे. दुबे यांच्या वक्तव्याचा शरदचंद्र पवार पक्षाकडूनही निषेध करण्यात आला असून घाटकोपर येथे मंगळवारी जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घाटकोपर पश्चिम – वेलकम हॉटेल परिसरात जोडे मारो आंदोलन (बुटांनी मारणे) सुरू केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्यांनी सांगितले की, निशिकांत दुबे यांचे विधान केवळ मराठी भाषेवर टीका करणारे नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट हल्ला करणारे होते. भाजपचा जुना खेळ पुन्हा सुरू झाला आहे. ते बिहार निवडणूक आणि महाराष्ट्रात आग लावत आहेत. त्यांचे राजकारण विधाने करून मराठी माणसाच्या भावना भडकवण्याचे आहे. पण यावेळी महाराष्ट्र गप्प बसला नाही. मराठी तरुणांनी हातात बूट घेऊन स्पष्ट उत्तर दिले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले म्हणाले की, ही लढाई फक्त निशिकांत दुबेंसाठी नाही, तर ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे.जो कोणी मराठी माणसाला कमी लेखेल त्याला शिक्षा होईल.
काय म्हणाले होते निशिकांत दुबे ?
मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर खासदार निशिकांत दुबे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. “हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रादेखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, अशी पोस्ट दुबे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केली. इतकंच नाही तर “मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावं, त्यांना आपटून आपटून मारू,” असं ते म्हणाले.
कोण आहेत निशिकांत दुबे?
* निशिकांत दुबे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यार्थी शाखेतून केलेली.
* २००९ मध्ये भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी झारखंडच्या गोंडा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली.
* पहिल्याच निवडणुकीत दुबे यांनी काँग्रेसचे उमेदवार फुरकान अन्सारी यांचा जवळपास सहा हजार मताधिक्यांनी पराभव केला.
* २००९ ते २०२४ या कालावधीत गौंडा लोकसभा मतदारसंघातून दुबे हे सलग तीनवेळा निवडून आलेले आहेत.
* २०२४ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दुबे यांच्याकडे तब्बल ७४ कोटी रुपयांची संपत्ती * असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
* दुबे यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केलेली असून त्यांच्यावर दंगली भडकविण्याच्या आरोपाखाली सात ते आठ गुन्हे दाखल आहेत.
* एप्रिल २०२५ मध्ये निशिकांत दुबे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाबाबत वादग्रस्त विधान केलं होतं.
* देशात धार्मिक युद्ध भडकवण्यास सर्वोच्च न्यायालय जबाबदार असून ते आपली मर्यादा ओलांडत आहेत, असं दुबे म्हणाले होते.
* प्रत्येक गोष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयातच जावं लागत असेल, तर लोकसभा व विधानसभा बंद करून टाकावी, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती.
* देशात सुरू असलेल्या सर्व गृहयुद्धांना केवळ भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे जबाबदार आहेत, अशी भाषाही दुबे यांनी वापरली होती.
* निशिकांत दुबे यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि भाजपाने स्वत:ला या वादापासून दूर ठेवलं होतं.














