kshitij Magazine & News

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आता पाकिस्तानी अपप्रचाराचे प्रवक्ते झाले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत आता आत्मनिर्भर होत आहे. पण काँग्रेसला मात्र मुद्द्यांसाठी पाकिस्तानवर अवलंबून राहावं लागत आहे. काँग्रेस पाकिस्तानकडून मुद्दे आयात करत आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष दुर्दैवाने पाकिस्तानच्या अपप्रचाराचे प्रवक्ते बनले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत म्हटले.

भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमची जगभरात चर्चा आहे. आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या हल्ल्यांना परतवून लावले. मी आज एक आकडा सांगू इच्छितो, जो ऐकून देशाला गर्व वाटेल. ९ मे रोजी पाकिस्तानने १००० क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सनी हल्ला केला. भारताच्या हवाई दलाने हे सर्व क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केले, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत दिली.

भारताने कोणत्याही जागतिक नेत्याच्या सांगण्यावरून शस्त्रविराम केलेला नाही. ९ मे रोजी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मी काही वेळाने त्यांच्याशी बोललो. उपराष्ट्राध्यक्षांनी मला सांगितले की, पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना ठणकावून सांगितले की, पाकिस्तानने असा काही प्रयत्न केला तर त्यांना महागात पडेल. आम्ही मोठा हल्ला करून त्यांना उत्तर देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगितले.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वसरक्षणाच्या कारवाईपासून रोखले नाही. संयुक्त राष्ट्रातील १९० देशांपैकी फक्त केवळ तीन देशांनी पाकिस्तानच्या बाजूने विधान केले. पण इतर सर्व देशांचे समर्थन भारताला लाभले. जगाचे समर्थन आपल्याला मिळाले. पण दुर्दैव हे आहे की, काँग्रेसचे समर्थन मिळू शकले नाही.