अभिनेता अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी 3’ सिनेमा चर्चेत असतानाच त्याने आणखी एका चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना तब्बल 18 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि सैफ अली खानची जोडी पाहायला मिळणार आहे. नुकताच अक्षयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तो सैफसोबत शूट सुरू करताना दिसत आहे.अक्षय कुमार आणि सैफ अली खान 18 वर्षांनंतर प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगलाही दोघांनी सुरुवात केली आहे. शूटच्या पहिल्या दिवसाचा व्हिडीओ अक्षयने अलीकडेच आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो सैफ अली खान आणि प्रियदर्शन यांच्याशी चर्चा करताना दिसतो. तसेच अक्षयच्या हातात चित्रपटाच्या नावाची पाटी देखील पाहायला मिळत आहे.
अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले, ‘आपण सगळेच थोडेसे शैतान आहोत. कुणी वरून संत, तर कुणी आतून हैवान. माझ्या आवडत्या दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘हैवान’ चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात केली आहे. तब्बल 18 वर्षांनंतर सैफसोबत काम करताना खूप उत्साह आणि आनंद वाटत आहे. चला, आता हैवानियतला सुरुवात करूया.’ अक्षयची ही पोस्ट आता तुफान व्हायरल झाली आहे.
अक्षय कुमार आणि सैफ अली खानने यापूर्वी ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, ‘ये दिल्लगी’, ‘तू चोर मैं सिपाही’, ‘कीमत’ आणि ‘टशन’ अशा चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ‘टशन’ हा त्यांचा एकत्रितपणे केलेला शेवटचा चित्रपट होता. दरम्यान, अक्षय लवकरच ‘जॉली एलएलबी 3’मध्येही दिसणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजेच 19 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून यात अक्षयसह अर्शद वारसीही झळकणार आहेत.











