चीनमधील तियानजिन येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची त्रिपक्षीय बैठक झाली. या तिन्ही नेत्यांनी एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधल्याने आणि छायाचित्रांमध्ये त्यांच्यात उत्तम संबंध दिसून आल्याने अमेरिकेसह जगातील अनेक देशांचे लक्ष वेधले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन हे एकाच वेळी एकत्र, एकमेकांचे बोलणे ऐकत, हसतमुख चेहऱ्याने आणि त्यांच्यातील संवाद कॅमेऱ्यात कैद झाले. चीनच्या तियानजिनमधून आलेले हे दृश्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिंतेत भर घालणारे असू शकते. कारण त्यांनी भारताच्या विरोधात ‘टॅरिफ बॉम्ब’ टाकला आहे. ही बैठक कोणत्याही तिसऱ्या देशाचा आपल्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होऊ शकत नाही. विशेषतः जर तो देश दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल, असा संदेश देणारी होती.
एससीओ शिखर परिषदेची एक महत्त्वाची बैठक होत आहे. अनेक मोठे देश त्यात सहभागी झाले आहेत. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणांना कसे सामोरे जायचे यावरही विचारमंथन सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचीही भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबतही चर्चा केल्याची शक्यता असून, अनेक मुद्द्यांवर एकमत होईल असे मानले जात आहे.रविवारी पंतप्रधान मोदींची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय बैठक झाली. अनेक वर्षांनंतर झालेल्या या बैठकीत भारत-चीन संबंधांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. दोन्ही नेत्यांनी परस्पर भागीदारीचे महत्त्व समजून घेतले आणि भविष्यात सहकार्य वाढवण्याबद्दल चर्चा केली.
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर संमेलनाच्या सुरुवातीपूर्वीच भारत, चीन आणि रशियाच्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांची भेट घेतली. या बैठकीत त्यांच्यामध्ये उत्तम समन्वय आणि ‘कमाल केमिस्ट्री’ दिसून आली. या भेटीनंतर, पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत म्हटले की, “तियानजिनमध्ये चर्चा सुरू आहे! एससीओ शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि राष्ट्राध्यक्ष शी यांच्यासोबत विचारांचे आदानप्रदान झाले.” या ट्वीटमध्ये त्यांनी तिन्ही नेते एकत्र असलेले 2 फोटोही शेअर केले आहेत.
शिखर परिषदेदरम्यान, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, चीन प्रादेशिक सुरक्षेला नवीन उंचीवर नेण्यासाठी सर्व देशांसोबत एकत्र काम करेल. या शिखर परिषदेने आंतरराष्ट्रीय संबंधांना एक नवीन दिशा दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या वर्षीचे एससीओ शिखर संमेलन हे 10 सदस्य असलेल्या गटाचे सर्वात मोठे संमेलन आहे, कारण चीनने संयुक्त राष्ट्र महासचिवांसह 20 परदेशी नेत्यांना आणि 10 आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे. हे संमेलन एका खास तयार केलेल्या केंद्रात आयोजित केले गेले आहे. या शिखर संमेलनापूर्वी रविवारी शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली होती. तर, एससीओ संमेलनानंतर सोमवारी पंतप्रधान मोदी यांची रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबतही द्विपक्षीय बैठक होणार आहे. यावरून भारताचे परराष्ट्र धोरण स्वतंत्र असल्याचे दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत भाषण करणार आहेत. या पार्श्वभूमी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनही या शिखर परिषदेसाठी उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गळाभेट घेतल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या या गळाभेटीची फोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान एससीओ शिखर परिषदेचे अनेक फोटो समोर आले आहेत, त्या फोटोंमध्ये मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकत्र दिसत आहेत. यानंतर या फोटोंमधून मोठे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.














